इंग्लंडमधील हवामान बदलल्याने भारतीय संघावर दडपण

वृत्तसंस्था
Tuesday, 31 July 2018

इंग्लंडच्या हवेत परीक्षा फलंदाजांचीच नव्हे तर गोलंदाजांचीही असते. आपली गोलंदाजी नक्कीच सक्षम आहे. दक्षिण आफ्रिकेत कोणालाही अपेक्षा नसताना सर्व कसोटीत आपण त्यांना दोनदा बाद केले होते. भारतीय गोलंदाजांनी दडपण न घेता अचूक दिशा व टप्पा राखायला हवा. आपली गोलंदाजी जगातील सर्वोत्तम आहे, हा विश्‍वास आपण सर्वांनीच ठेवायला हवा. 
- अजिंक्‍य रहाणे 

बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील उष्णतेच्या लाटेमुळे खेळपट्टी कोरडी होणार आणि ती फिरकीला साथ देणार, याचा भारतीय संघाला फायदा होणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अचानक इंग्लंडमधील हवामान बदलले आहे, दोन दिवसांत अचानक काळे ढग दाटून येण्यास सुरवात झाल्यामुळे पहिल्या कसोटीची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. 

जूनच्या चौथ्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला, तेव्हापासून इंग्लंडमध्ये उष्णतेची लाट आहे. ट्‌वेंटी ट्‌वेंटी तसेच एकदिवसीय लढतींच्यावेळी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. चांगलेच ऊन होते, त्या वेळी आपण जणू भारतातच खेळत आहोत, असा भास व्हावा इतकी हवा मस्त गरम होती. कसोटीच्या वेळीही हीच परिस्थिती राहणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

दोन दिवसांत अचानक काळे ढग संपूर्ण इंग्लंडवर दाटून आले आहेत. तुरळक पाऊस झाला तरी हवा एकदम गारेगार होत आहे. गरम हवामानाने मर्यादित षटकांच्या सर्व सामन्यांच्या वेळी खेळपट्ट्या कोरड्या होत्या. त्याचा फायदा फिरकी गोलंदाजांना झाला. आता बदललेल्या हवामानाचा फायदा वेगवान आणि स्विंग करणाऱ्या गोलंदाजांना होणार असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. 

इंग्लंड दौऱ्यावर स्वेटर आवश्‍यक याचा विसर सहा आठवड्यांत पडला होता; पण दोन दिवसांत स्वेटर चढवल्याशिवाय बाहेर पडण्याची धास्ती वाटत आहे. पाऊस खूप नाही, पण ढग दाटून आल्याने आणि तुरळक पावसाच्या सरी दिवसभर होत असल्याने गवताचा रंग बदलून हिरवा होण्यास सुरवात झाली आहे. हेच हिरवे गवत खेळपट्टीवर असले, की फलंदाजांच्या मनात धडकी भरते. यजमानांना या बदललेल्या हवामानाचा फायदा होईल, असाच अंदाज वर्तवण्यास इंग्लंडमध्ये सुरवातही झाली आहे. 

त्यातच फलंदाजांचे अपयश 
पहिल्या कसोटीपूर्वीच्या एकमेव सराव सामन्यातून भारतीय संघाला फारसे काही साध्य झाले नाही. फलंदाजांना अपेक्षित सूर गवसला नाही. चेतेश्वर पुजारा, शिखर धवन दोनही डावांत अपयशी ठरले. त्यामुळे संघ निवडीची समस्या वाढली. त्यातच बर्मिंगहॅमचा पहिला सराव पावसाने रद्द करावा लागला. सोमवारी संघाने कधी मोकळ्या मैदानावर, तर कधी इनडोअर सराव सुविधेचा वापर करून सराव केला. 

इंग्लंडच्या हवेत परीक्षा फलंदाजांचीच नव्हे तर गोलंदाजांचीही असते. आपली गोलंदाजी नक्कीच सक्षम आहे. दक्षिण आफ्रिकेत कोणालाही अपेक्षा नसताना सर्व कसोटीत आपण त्यांना दोनदा बाद केले होते. भारतीय गोलंदाजांनी दडपण न घेता अचूक दिशा व टप्पा राखायला हवा. आपली गोलंदाजी जगातील सर्वोत्तम आहे, हा विश्‍वास आपण सर्वांनीच ठेवायला हवा. 
- अजिंक्‍य रहाणे 

संबंधित बातम्या