संयमी सुरवातीनंतर इंग्लंडचा डाव गडगडला 

सुनंदन लेले
Friday, 7 September 2018

लंडन : अखेरचा कसोटी सामना खेळणारा ऍलिस्टर कूक आणि पुन्हा बढती मिळालेला मोईन अली यांच्या संयमाची कसोटी बघत भारतीय गोलंदाजांनी मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या टप्प्याच इंग्लंडला दणके दिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 198 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा जोस बटलर 11, तर आदिल रशीद 4 धावांवर खेळत होता. 

लंडन : अखेरचा कसोटी सामना खेळणारा ऍलिस्टर कूक आणि पुन्हा बढती मिळालेला मोईन अली यांच्या संयमाची कसोटी बघत भारतीय गोलंदाजांनी मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या टप्प्याच इंग्लंडला दणके दिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 198 धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा जोस बटलर 11, तर आदिल रशीद 4 धावांवर खेळत होता. 

या कसोटीसाठी इंग्लंडने संघ कायम ठेवला, तर भारताने हार्दिक पंड्या आणि अश्‍विन यांना वगळले. पंड्याच्या जागी भारताने हनुमा विहारीला पदार्पणाची संधी दिली. तो भारताचा 292वा कसोटीपटू ठरला. अश्‍विनची जागा रवींद्र जडेजाने घेतली. 
मालिकेत पाचव्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर इंग्लंड कर्णधार ज्यो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा अपेक्षित निर्णय घेतला. त्यानंतर ऍलिस्टर कूक आणि मोईन अलीचे अर्धशतक हे इंग्लंडच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. एरवी फलंदाजीस पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचे अतिसावध फलंदाजी करण्याचे नियोजन त्यांना चांगलेच महागात पडले. त्यामुळेच चांगली सुरवात मिळाल्यानंतरही त्यांचा डाव शेवटच्या सत्रातील इशांतच्या माऱ्यामुळे मर्यादित राहिला. 

खेळाला सुरवात झाल्यावर पहिल्या काही षटकांतच खेळपट्टीत जान नसल्याचे स्पष्ट झाले. वेगवान गोलंदाज जोर लावून मारा करत होते, तरी चेंडू मांडीच्या वर उसळी घेत नव्हता. किटन जेनिंग्ज आणि ऍलिस्टर कुकने त्याचा फायदा घेत अर्धशतकी भागीदारी रचली. त्या वेळी जडेजाच्या वळलेल्या चेंडूवर तिरकस खेळण्याच्या नादात जेनिंग्ज राहुलकडे झेल देऊन बाद झाला. या कसोटीतही इंग्लंडने तिसऱ्या क्रमांकावर मोईन अलीवर भरवसा ठेवला. 

उपहारानंतर मोईन अली आणि कुक दोघांनाही जीवदान लाभले. ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर रहाणेने कुकचा झेल सोडला. पुढच्याच षटकात बुमराच्या टप्पा पडून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कोहलीने मोईन अलीचा झेल टाकला. त्या वेळी अनुक्रमे कुक 37, तर मोईन अली फक्त 2 धावांवर खेळत होता. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत कुकने सावध खेळ करून अर्धशतकी मजल मारली. मोईन अली इतका खराब फलंदाजी करत होता की, दुपारच्या सत्रात मोहंमद शमीला 20 पेक्षा जास्त वेळेला तो चकला. शमीचे दुर्दैव इतके की एकदाही चेंडूने बॅटची कड घेतली नाही. 

चहापानानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडवर दडपण ठेवले. बुमराने कूकचा बचाव भेदला, कर्णधार रुटचाही मार्ग रोखला. इशांतने बेअरस्टॉ, तर जडेजाने स्टोक्‍सचा अडथळा दूर केला. या अखेरच्या सत्रात इशांतचा स्पेल कमालीचा भेदक ठरला. त्याने नशीबवान मोईन आणि सॅम करन यांना बाद करून इंग्लंडवर पूर्ण दडपण आणले. रुट, बेअरस्टॉ आणि सॅम करन या इंग्लंडच्या मालिकेतील तारणहार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. 

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड पहिला डाव 90 षटकांत 7 बाद 198 (ऍलिस्टर कूक 71, मोईन अली 50, केटन जेनिंग्ज 23, इशांत शर्मा 3-28, जसप्रित बुमरा 2-41 रवींद्र जडेजा 2-57)


​ ​

संबंधित बातम्या