मालिका जिवंत ठेवण्याचे कोहलीसमोर आव्हान

सुनंदन लेले
Friday, 17 August 2018

तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान पाऊस उच्छाद मांडणार नाही असा अंदाज वर्तवला गेला आहे. पाचही दिवस बहुतांशी वेळेला वातावरण ढगाळ असेल ज्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होणार आहे. नॉटींगहॅम कसोटी सामना आठवडा अखेरीला चालू होत असल्याने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पहिल्या दोन दिवसांच्या खेळला मिळाल्याचे संयोजकांनी सांगितले.

नॉटींगहॅम : नॉटींगहॅम शहरातील आल्हाददायी हवा, खेळपट्टीचा खोडकर स्वभाव आणि भारतीय संघाची स्वींग गोलंदाजीला खेळताना होणारी त्रेधा या सगळ्याचा विचार करून ज्यो रुटने सॅम करनच्या जागी बेन स्टोकसचा समावेश करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला संघ निवड करताना बरीच काथ्याकूट करावी लागणार आहे. कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज संघात येईल आणि त्याबरोबर फलंदाजीत काय बदल केले जातात याकडे सगळ्यांचे बारीक लक्ष असेल. 

पहिल्या कसोटीतील पराभवाने चटका लागला होता. दुसर्‍या कसोटीतील पराभवाने हादरायला झाले इतका भारतीय संघाचा खेळ सुमार झाला. यजमान संघाने 2-0 आघाडी घेतली असली तरी त्यावर ते समाधान मानणार नाहीत हे नक्की. नॉटींगहॅम कसोटी जिंकून मालिका ट्रेंटब्रीज मैदानावरच निकालात लावायचा विचार ज्यो रुट करतो आहे. प्रमुख फलंदाज इंग्लंडचे चमकत नाहीत आणि अष्टपैलू खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. बेन स्टोकस संघात आल्यावर अष्टपैलू खेळाची ताकद अजून वाढणार आहेत.

भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली 100% तंदुरुस्त नसला तरी सामना खेळण्याइतपत आणि फलंदाजी करण्याइतपत बरा झाला आहे. नव्या नियमानुसार फलंदाजाला दुखापत झाल्यास ‘रनर’ घेता येत नाही. जिद्दी विराट मैदानात उतरेल तरीही त्याला दुखापत उग्र रूप धारण तर करणार नाही ना याची धास्ती असेल. कोहली कप्तान झाल्यापासूनच्या सर्व कसोटी सामन्यांची एक खासीयत आहे की कोणत्याही सलग दोन कसोटीत सामन्यात आदल्या सामन्यातील संपूर्ण संघ खेळलेला नाही. सामना जिंको किंवा हरो,  प्रत्येक सामन्यात कमीतकमी एक बदल संघात विराट कोहलीने केला आहे.  

दिनेश कार्तिकला लॉर्डस कसोटी दरम्यान डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. कार्तिकची दुखापत बरी झाली नाही तर ऋषभ पंतचे कसोटी पदार्पण होऊ शकते. विराट कोहली जसप्रीत बुमराला संघात घेण्याचा विचार करेल असे वाटते. इंग्लंडच्या गोलंदाजांना तोंड देताना काय नवीन योजना राबवली पाहिजे जेणेकरून दडपणाचा बाण उलटा फिरून गोलंदाजांकडे जाईल हे ठरवणे गरजेचे झाले आहे. 

तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान पाऊस उच्छाद मांडणार नाही असा अंदाज वर्तवला गेला आहे. पाचही दिवस बहुतांशी वेळेला वातावरण ढगाळ असेल ज्याचा फायदा वेगवान गोलंदाजांना होणार आहे. नॉटींगहॅम कसोटी सामना आठवडा अखेरीला चालू होत असल्याने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पहिल्या दोन दिवसांच्या खेळला मिळाल्याचे संयोजकांनी सांगितले.

संघातील वातावरण अस्थिर नाही : विराट कोहली
सामन्याकरता मैदानात उतरताना आम्ही फक्त तो सामना जिंकण्याकरता सर्वोत्तम 11 खेळाडू कोण इतकाच विचार करतो. त्याकरता संघात बदल करावे लागले तर मी करतो. कोणाला संघाबाहेर बसावे लागले तर नाइलाज असतो. पण म्हणून संघातील वातावरण अस्थिर आहे असे कोणी म्हणत असले तर त्यात तथ्य नाही. 

फलंदाज अमरपट्टा घालून येत नाही. एका चेंडूवर त्याची विकेट लिहिलेली असते. म्हणून मी बाद कधी होणार असा विचार चांगला फलंदाज करत नसतो. मी तर म्हणेन की त्या बाद होण्याच्या चेंडू अगोदर तुम्ही काय ठसा उमटवता याला महत्त्व आहे. इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्ट्या अशा असतात की शतक केलेला फलंदाजही स्वत:ला स्थिर समजत नाही. म्हणून मला वाटते की खेळपट्टीवर नुसता उभे राहण्याचा विचार करत बचाव करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून संधी मिळताक्षणी धावा जमा करणारे फटके मारता यायला हवेत. 

संबंधित बातम्या