तिसर्‍या कसोटीवर भारताची पकड; 292 धावांची आघाडी

सुनंदन लेले
Sunday, 19 August 2018

पहिल्या डावात भारताला 168 धावांची घसघशीत आघाडी मिळाल्यावर दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांनी धीराने खेळ करून दुसर्‍या दिवस अखेरीला 2 बाद 124 असा धावफलक उभारला. आता भारताकडे एकूण  292 धावांची आघाडी जमा झाली आहे.

ट्रेंट ब्रीज : दुसर्‍या नव्या चेंडूने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. शेवटच्या 5 विकेटस 22 धावांमध्ये गेल्याने धावसंख्या 329च्या पुढे जाऊ शकली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडच्या फलंदाजीला भारतीय वेगवान गोलंदाजांनी धक्के दिल्याने ट्रेंट ब्रीज कसोटीतली रंगत वाढली. हार्दिक पंडयाने चक्क पाच फलंदाजांना बाद करून इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांमध्ये गुंडाळताना धमाल उडवली. रिषभ पंतने पदार्पणाच्या सामन्यात पाच झेल पकडून विक्रम केला. पहिल्या डावात भारताला 168 धावांची घसघशीत आघाडी मिळाल्यावर दुसर्‍या डावात भारतीय फलंदाजांनी धीराने खेळ करून दुसर्‍या दिवस अखेरीला 2 बाद 124 असा धावफलक उभारला. आता भारताकडे एकूण  292 धावांची आघाडी जमा झाली आहे.

नॉटींगहॅम शहरात पावसाची अगदी बारीक भुरभुर चालू असल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांना दुसर्‍या दिवशीच्या खेळ चालू व्हायला 30 मिनिटे वाट बघावी लागली.  दुसर्‍या नव्या चेंडूवर ब्रॉड आणि अँडरसनने आक्रमक गोलंदाजी केली. सुरुवातीच्या 3विकेटस् 22 धावांमध्ये गेल्या होत्या आणि शेवटच्या 5 फलंदाजांना 22 धावांमध्येच तंबूत परत पाठवले गेले. थोडक्यात भारताच्या 8 फलंदाजांना 44 धावांत बाद करण्यात यश आल्याने धावसंख्या अपेक्षेइतकी फुलली नाही. भारताचा डाव 329 धावांवर आटोपला.

उपहाराअगोदर इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने टकाटक फटके मारून सहजी धावा जमा करणे चालू केले. खेळपट्टी बरोबर यजमान संघाच्या फलंदाजीच्या वेळी चांगली का वागते असा विचार करत जेवण पूर्ण झाले. जेवताना भारतीय गोलंदाजांनी काय खाल्ले माहीत नाही. ईशांत शर्माने अ‍ॅलिस्टर कुकला बाद केले आणि दरवाजे उघडले गेले. समोरून बुमराने जेनिंग्जला बाद केले आणि लगेच ईशांतने ऑली पोपला बाद झेल बाद केले. तीनही फलंदाज बाद होताना रिषभ पंतने झेल पकडले होते.

कर्णधार ज्यो रुटला बाद करायला भारतीय गोलंदाज प्रयत्न करत होते. अचानक विराट कोहलीने हार्दिक पंड्याला गोलंदाजीला बोलावले. तमाम माजी खेळाडूंनी हार्दिक पंड्याच्या संघातील जागेवरून टिका केली होती. क्रिकेट मात्र रविवारी हार्दिक पंड्यावर खूष होते. पंड्याने पहिल्यांदा ज्यो रुटला बाद केले तेव्हा बोटे चेमटून घेत विराट कोहलीने झेल पकडला. समोरच्या बाजूने शमीने बेन स्टोकसला झेल द्यायला भाग पाडले. मग पंड्याने जॉनी बेअरस्टो, वोकस, रशीद आणि ब्रॉडला बाद करून धमाल उडवली.

जोस बटलरने हाणामारी करून 39 धावा केल्याने इंग्लंडला 161 धावा तरी करता आल्या. दुसर्‍या डावात सलामीच्या जोडीने परत एकदा अर्धशतकी सुरुवात करून दिली. 36 धावा करून लोकेश राहुल आणि 44 धावा करून शिखर धवन बाद झाले. पुजाराने कोहलीसोबत नाबाद राहत धावफलक 2 बाद 124 वर नेला. दुसरा दिवस गाजवत तिसर्‍या कसोटीवर भारताने जबरदस्त पकड मिळवली आहे.

संबंधित बातम्या