भारत-बांगलादेश संघांत आज "फायनल'
- टी-20 क्रिकेट मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नागपूरच्या सामन्याला एक प्रकारे "फायनल'चे स्वरूप आलेले आहे.
- भारतीय संघ मायदेशातील वर्चस्व कायम ठेवतो, की बांगलादेश संघ भारताविरुद्ध प्रथमच मालिका विजय साकार करतो, याचा निर्णय उद्या रविवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे
नागपूर - दिल्ली येथील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने अनपेक्षित धक्का दिल्यानंतर भारतीय संघाने राजकोटमध्ये जोरदार प्रतिहल्ला करत तीन सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे नागपूरच्या सामन्याला एक प्रकारे "फायनल'चे स्वरूप आलेले आहे. यात बाजी मारून भारतीय संघ मायदेशातील वर्चस्व कायम ठेवतो, की बांगलादेश संघ भारताविरुद्ध प्रथमच मालिका विजय साकार करतो, याचा निर्णय उद्या रविवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे.
मालिका आरंभ होण्यापूर्वी बहुतेकांनी यजमान भारत निर्विवाद वर्चस्व राखणार, असेच मानले होते. मात्र, बांगलादेशने दिल्ली येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत करून तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरविले. भारतीय संघाने दुसऱ्या लढतीत आठ गड्यांनी दणदणीत विजय मिळवून बांगलादेशला त्यांची खरी जागा दाखवून दिली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेल्या कर्णधार रोहित शर्माने 85 धावांची तुफानी खेळी करून मालिकेतील रंगत वाढविली. त्यामुळे आता मालिकेत शेवटचा अंतिम वार कोण करतो, याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता राहील.
भारतीय संघासाठी नेहमीच "लकी' राहिलेल्या जामठा स्टेडियमचा इतिहास बघता, या वेळीदेखील यजमान भारताचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. मात्र टी-20 सामन्यात काहीही घडू शकत असल्यामुळे "रोहित ऍण्ड कंपनी' पाहुण्यांना हलक्याने घेऊन पायावर धोंडा पाडून घेण्याची चूक करणार नाही, हेही तितकेच खरे. जानेवारी 2017 मध्ये झालेल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा अवघ्या पाच धावांनी पराभव केला होता. भारतीय खेळाडूंसाठी त्या आठवणी प्रेरित करणाऱ्या असल्या तरी प्रत्येक सामना नवीन असतो, याची स्वत: रोहितलाही जाणीव आहे. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावेल, यात शंका नाही.
सलामीवीर रोहित व शिखर धवनचा फॉर्म भारतीय संघाची जमेची बाजू असली तरी के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक रिषभ पंत, शिवम दुबे हे मधल्या फळीतील फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर संघाचे यशापयश अवलंबून राहील. गोलंदाजीची भिस्त फिरकीपटू युझवेंद्र चहल, अष्टपैलू कृणाल पांड्यासह युवा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर, खलील अहमद व वॉशिंग्टन सुंदर यांच्या खांद्यावर राहील. कर्णधार महंमुदुल्लाहच्या नेतृत्वात दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघातही यष्टीरक्षक मुशफिकूर रहिम, लिटॉन दास, सौम्या सरकार व मुस्तफिजूर रहमानसारखे "मॅच विनर' खेळाडू आहेत. त्यामुळे उभय संघांदरम्यानचा हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.