'वर्ल्ड कप'साठी आणखी एक गोलंदाज हवाय! पर्याय भरपूर; कोण खेळणार? 

वृत्तसंस्था
Monday, 11 February 2019

गेल्या काही महिन्यांमध्ये निवड समिती, भारतीय कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारत 'अ' संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एकत्रित काम करून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघाला आकार दिला आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतीय संघ आता समतोल झाला आहे.

मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंची जागा आता निश्‍चित झाली असली, तरीही निवड समिती काही पर्यायांवर अजूनही विचार करत आहे. 'या स्पर्धेसाठी प्रमुख खेळाडूंची जागा निश्‍चित झालेली आहे; काही जागांवरील खेळाडूंसाठी विचार सुरू आहे', असे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सांगितले आहे. अजून विचार सुरू असलेल्या पर्यायांमध्ये चौथ्या वेगवान गोलंदाजाची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये निवड समिती, भारतीय कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारत 'अ' संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एकत्रित काम करून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संघाला आकार दिला आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे भारतीय संघ आता समतोल झाला आहे. तरीही, इंग्लंडमध्ये होणारी स्पर्धा लक्षात घेत भारतीय संघ व्यवस्थापन संघात चार वेगवान गोलंदाजांना स्थान देण्याचाही विचार करत आहे. 

सध्याच्या संघामध्ये जसप्रित बुमरा, भुवनेश्‍वर कुमार आणि महंमद शमी हे तीन वेगवान गोलंदाज निश्‍चित आहेत. चौथ्या स्थानासाठी किमान तीन गोलंदाजांमध्ये चुरस आहे. 

बुमरा, भुवनेश्‍वर आणि शमी हे तिघेही उजव्या हाताने गोलंदाजी करतात. त्यामुळे एखाद्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्याचा पर्यायही निवड समितीसमोर आहे. यामध्ये खलील अहमद हे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून खलील भारतीय संघासोबत आहे आणि पुरेशा सामन्यांमध्ये त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधीही देण्यात आली आहे. या सामन्यांमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली नसली, तरीही गुणवत्ता नक्कीच दाखवून दिली आहे. 

चौथ्या स्थानासाठी उमेश यादव सर्वांत आघाडीवर आहे. 2010 पासून तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणारा उमेश सातत्याने संघाच्या आत-बाहेर असतो. त्याचा वेग चांगला आहे आणि कमाल तंदुरुस्तीमुळे तो दर्जेदार क्षेत्ररक्षकही आहे. स्विंग आणि वेगाच्या जोरावर तो सर्वोत्तम फलंदाजालाही अडचणीत आणू शकतो. 

ईशांत शर्मा हा सध्याच्या भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वांत अनुभवी आहे. गेल्या तीन वर्षांत तो एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही. पण कसोटीमध्ये तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्याकडे आता अनुभवही आहे. त्यामुळे बुमरा-भुवनेश्‍वर-शमी या त्रयीला तो चांगला आधारही देऊ शकतो. 

संबंधित बातम्या