जागतिक बॅडमिंटनमध्ये भारताच्या चौघांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 August 2019

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून माघारीचे सत्र सुरूच आहे. पुरुष एकेरीतून व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन आणि शि क्‍व्यू यांनी माघार घेतल्यामुळे एच. एस. प्रणॉयला या स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे.

नवी दिल्ली - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून माघारीचे सत्र सुरूच आहे. पुरुष एकेरीतून व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन आणि शि क्‍व्यू यांनी माघार घेतल्यामुळे एच. एस. प्रणॉयला या स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. 

पुरुष एकेरीतील अनेक खेळाडूंच्या माघारीमुळे आता भारताचे चार खेळाडू या स्पर्धेत असतील. माजी जगज्जेता ॲक्‍सेलसेन, तसेच शि युक्वी यांनी आपण पुरेसे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले आहे. डेन्मार्कच्या ॲक्‍सेलसेन 

याने पाठदुखीने बेजार असल्याचे सांगितले; तर चीनच्या युक्वी याने गुडघा दुखापत बरी नसल्याचे सांगितले. याच कारणास्तव त्याने इंडोनेशिया ओपनमधून माघार घेतली आहे. 

जागतिक स्पर्धेच्या पुरुष एकेरीत खेळणारा प्रणॉय हा चौथा भारतीय असेल. यापूर्वीच किदांबी श्रीकांत, समीर वर्मा, बी. साईप्रणीत यांना प्रवेश देण्यात आला आहे. जागतिक स्पर्धा बासेल (स्वित्झर्लंड) येथे १९ ते २५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.

कॅरोलिन मरिनची माघारच
गतविजेत्या कॅरोलिन मरिन हिने गुडघा दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे माघार घेतली आहे. तिच्या गुडघ्यावर २९ जानेवारीस शस्त्रक्रिया झाली होती. तिने या स्पर्धेत खेळण्याची सुरवातीस तयारी दाखवली होती; पण रविवारी व्हिडिओ मेसेजद्वारे माघार घेत असल्याचे सांगितले. जागतिक स्पर्धा नजीक आली आहे. अजून पूर्ण रिकव्हरी झालेली नाही, त्यामुळे सप्टेंबरपासूनच स्पर्धा खेळणे योग्य होईल, असे ठरवले असल्याचे मरिनने सांगितले. तिच्यासाठी जागतिक स्पर्धेपेक्षा ऑलिंपिक जास्त महत्त्वाचे आहे. अगदी काही दिवसांपूर्वी मरिनने जागतिक स्पर्धेतील माघारीचे संकेत देताना ऑलिंपिक सुवर्णपदक राखणे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगितले होते. मरिनच्या माघारीने थायलंडच्या निचॉन जिंदापॉल हिला प्रवेश देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या