बीसीसीआयला विस्मरण झाले की काय? कधी होणार विवोची गच्छंती...

टीम ई-सकाळ
Monday, 29 June 2020

आयपीएल पुरस्कर्त्यांबाबत आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक होईल, असे भारतीय मंडळाने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते, पण त्याची तारीख ठरलेली नाही. प्रशासकीय समितीच नव्हे, तर भारतीय मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांना चिनी कंपन्यांच्या पुरस्कर्त्याबाबत फेरविचार करण्याचे कोणी ठरवले, हा प्रश्न पडला आहे.

नवी दिल्ली : गलवान संघर्षानंतर चीनविरुद्धची लोकभावना तीव्र झाल्यावर सर्वत्र चिनी वस्तूंवर बंदी  घालण्याची मोहिम सुरू झाली त्याचवेळी आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेल्या चीनच्या ‘विवो’बाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, आयपीएलच्या प्रशासकीय समितीची लवकरच बैठक होणार असेही सांगण्यात आले प्रत्यक्षात मात्र अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. आयपीएल पुरस्कर्त्यांबाबत आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक होईल, असे भारतीय मंडळाने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते, पण त्याची तारीख ठरलेली नाही. प्रशासकीय समितीच नव्हे, तर भारतीय मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांना चिनी कंपन्यांच्या पुरस्कर्त्याबाबत फेरविचार करण्याचे कोणी ठरवले, हा प्रश्न पडला आहे. बैठकीची घोषणा करण्यापूर्वी आपल्याला विश्वासातही घेतले नसल्याचे प्रशासकीय समितीतील सदस्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेलही याबाबत अंधारात होते. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दबावामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा दबक्‍या आवाजात सुरू झाली आहे.

जिममध्ये जायचय? अगोदर हे वाचा 

सर्वसामान्य जनतेची भावना लक्षात घेऊन निर्णय घेत आहोत, की कोणत्याही राजकीय पक्षाच्या दडपणाखाली हा निर्णय झाला, अशी विचारणा करतानाच मंडळातील काही सदस्यांनी सरकारने चिनी उत्पादनावरील बंदीचा कोणताही निर्णय घेतलेला नसताना भारतीय मंडळाने घेण्याची गरज काय, अशी विचारणा केली. विवो ही चीनमधील कंपनी आयपीएलची मुख्य पुरस्कर्ती आहे. त्याचबरोबर पेटीएम आणि ऑनलाईन फॅंटसी गेम ड्रीम इलेव्हनमध्येही चीनमधील गुंतवणूक आहे.

करार रद्द केल्यास...

अपरिहार्य परिस्थितीचे कारण सांगून भारतीय मंडळास विवोचा आयपीएलला पुरस्कार रद्द करता येईल. प्रश्न करार रद्द करण्याच्या जाचक प्रक्रियेचा नसून त्याच्या परिणामांचा आहे. आयपीएलसाठी विवो दर वर्षी ४४० कोटी रुपये देत असते. आता नुकसानभरपाई म्हणून विवो प्रसंगी नऊशे कोटी रुपयांची मागणी करू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. विवो कायदेशीर प्रक्रिया करण्याऐवजी सामोपचाराने हा प्रश्न सोडवण्यास पसंती देण्याची शक्‍यता आहे. पुरस्कार रद्द केल्यास न्यायालयात गेल्यास भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि मोठ्या स्पर्धेसाठी पुरस्कर्ते होण्यात अडचणी येतात, याची जाणीव कंपन्यांनाही असते, असेही त्यांनी सांगितले.

शोएबनं सानियाच्या डोळ्यादेखत केल माहिराशी फ्लर्ट; मग काय चर्चा तर होणारच

पुरस्कर्ते गमावल्यास...
 

विवोबरोबरील पुरस्कार रद्द केल्यास पर्याय काय, अशी विचारणा भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कोरोना महामारीमुळे जगात मंदी आहे. पुरस्कर्ते रद्द केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होतील. त्याचबरोबर आयपीएलची ब्रॅंड व्हॅल्यू मोठ्या प्रमाणावर कमी होईल. नवे पुरस्कर्ते मिळवण्यात अडचणी येतील. एकंदरीत भारतीय क्रिकेट मंडळ कोणताही निर्णय घाईघाईने घेणार नाही. किंबहुना सध्या तरी पुरस्कर्ते बदलण्याचा विचार भारतीय मंडळ करण्याची शक्‍यता कमीच दिसत आहे. 

काय सांगतात आकडे
- 440 कोटी : विवोबरोबर बीसीसीआयचा दरवर्षाचा करार.
- 900 कोटी : मध्येच करार रद्द केल्यास विवो बीसीसीआयकडे नुकसानभरपाईची मागणी करू शकेल.


​ ​

संबंधित बातम्या