भारत पाकपेक्षा पुन्हा सरस 

वृत्तसंस्था
Thursday, 13 September 2018

मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत असलेल्या या सामन्यात भारताकडून मनवीरसिंगने दोन, तर आज वाढदिवस असलेल्या सुमीत पासीने गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला होता. सामना संपायला दोन मिनिटे असताना पाककडून एकमेव गोल करण्यात आला. 

ढाका : भारतीय संघाने पाकिस्तानवरील जागतिक फुटबॉलमधील वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केले. सॅफ अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पाकवर 3-1 असा विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारत या स्पर्धेचा सात वेळा विजेता आहे. 

पाच वर्षांनंतर भारत-पाक पुन्हा आमने सामने आले. जागतिक फुटबॉलमध्ये भारतीय संघ चांगली प्रगती करत असल्यामुळे पाकवर वर्चस्व अपेक्षित होते; परंतु पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ही लढत होत असल्यामुळे उत्सुकता वाढली होती, भारतीय प्रशिक्षक कॉन्स्टंटाईन यांनी आमच्यासाठी इतर सामन्यांप्रमाणे ही लढत असल्याचे सांगून आपल्या खेळाडूंवरील दडपण कमी केले होते. 

मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत असलेल्या या सामन्यात भारताकडून मनवीरसिंगने दोन, तर आज वाढदिवस असलेल्या सुमीत पासीने गोल करून भारताचा विजय निश्‍चित केला होता. सामना संपायला दोन मिनिटे असताना पाककडून एकमेव गोल करण्यात आला. 

भारताने वर्चस्व राखले असले तरी जम बसवण्यासाठी काही काळ द्यावा लागला होता. यामध्ये पाकिस्तानकडून आक्रमण वाढवण्यात आले होते. 36 व्या मिनिटाला पाकिस्तानला गोलक्षेत्राजवळ फ्री किक मिळाली होती; परंतु विशाल किथने सुरेख गोलरक्षण करून पाकचे प्रयत्न हाणून पाडले. मध्यंतराच्या अखेरच्या मिनिटालाही पाकला गोल करण्याची संधी होती. त्यांच्या हसन बाशीरने तिरकस किक मारली, त्यावर सद्दामने मारलेला हेडर भारताच्या गोलपोस्टच्या किंचित बाजूने गेला. 
मध्यंतरानंतर वेगळ्याच ताकदीचा भारतीय संघ दिसला. लगेचच मनवीरसिंगने पाकिस्तानचा बचाव भेदला आणि बरोबरीची कोंडी फोडली. त्यानंतर भारताने मागे वळून पाहिले नाही. भारताचा दुसरा गोलही मनवीरने केला, तर 84 व्या मिनिटाला पासीने गोल करून संघाला आपल्या वाढदिवसाची भेट दिली. 

दृष्टिक्षेपात 
- भारत आणि पाकमध्ये एकूण 23 लढती 
-10 सामन्यांत भारताचा विजय 
-10 सामने बरोबरीत. पाकचे तीन विजय 
-या अगोदरच लढत पाच वर्षांपूर्वी. 
-सॅफ स्पर्धेत भारत सात वेळा विजेते. 

संबंधित बातम्या