Asia Cup 2018 : हाँगकाँगने पळवले भारताच्या तोंडचे पाणी 

सुनंदन लेले
Wednesday, 19 September 2018

भारतासमोर सामना खेळताना कर्णधार अंशुमन रथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेऊन जणू विळीवर पाय ठेवला. कप्तान रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर शिखर धवन आणि रायुडुने मोठी भागीदारी रचली. इंग्लंडमधे साफ अपयशी ठरलेल्या शिखर धवनने दुबळ्या हॉंगकॉंगसमोर मान खाली घालून फलंदाजी करताना फॉर्म परत मिळवला. 14वे एक दिवसीय शतक ठोकताना शिखरने फक्त 105 चेंडू घेतले. 

दुबई : शिखर धवनच्या शतकाच्या पाठबळावर आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय फलंदाजांनी 50 षटकात 7 बाद 285 धावा उभारल्या. हॉंगकॉंग संघाकरता हे मोठे आव्हान वाटत होते. हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सहजी सामना करत 174 धावांची भागीदारी उभारली तेव्हा रोहित शर्माच्या पायाखालची वाळू सरकली होती. सलामीच्या जोडी फुटल्यावर वाढत जाणारी धावगती राखणे हॉंगकॉंगच्या अन्य फलंदाजांना जमले नाही. हॉंगकॉंगचा डाव 8 बाद 259 वर रोखला गेला. भारताने सामना 26 धावांनी जिंकला तरी कौतुकाचा मान लढत देणाऱ्या हॉंगकॉंग संघाला मिळाला. 

भारतासमोर सामना खेळताना कर्णधार अंशुमन रथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेऊन जणू विळीवर पाय ठेवला. कप्तान रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर शिखर धवन आणि रायुडुने मोठी भागीदारी रचली. इंग्लंडमधे साफ अपयशी ठरलेल्या शिखर धवनने दुबळ्या हॉंगकॉंगसमोर मान खाली घालून फलंदाजी करताना फॉर्म परत मिळवला. 14वे एक दिवसीय शतक ठोकताना शिखरने फक्त 105 चेंडू घेतले. 

भारतीय संघात पुनरागमन करताना अंबाती रायुडुने विश्वासाने फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. धोनी शून्यावर बाद झाल्यावर प्रेक्षक नाराज झाले. दिनेश कार्तिक षटकार मारायच्या प्रयत्नात बाद झाला तो बाबरने घेतलेला झेल प्रेक्षणीय होता. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 7 बाद 285चा धावफलक उभारला होता. 
अपेक्षेपेक्षा हॉंगकॉंग संघाच्या सलामीच्या जोडीने फारच मस्त फलंदाजी केली. निझाकत खानचे अर्धशतक आणि त्याने कप्तान अंशुमन रथ सोबत केलेली 174 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळाले होते. 36 डिग्री गरम हवेने नाही तर हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने केलेल्या फलंदाजीने भारतीय खेळाडूंना घाम फुटला. 

सामन्यातील 174 धावांच्या विक्रमी भागीदारीनंतर कर्णधार अंशुमन रथ कुलदीप यादवला बाद झाला. भारतीय फिरकी गोलंदाजांना निझाकत आणि रथने फारच आरामात खेळून काढल्याने शेवटच्या 15 षटकात हॉंगकॉंगला जवळपास साडे सातच्या सरासरीने 112 धावा काढायच्या होत्या. रथ पाठोपाठ सुंदर फलंदाजी करणारा निझाकत खान पायचित झाला. मोहंमद खलीलची ती पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ठरली. 35 आणि 36व्या षटकात दोन स्थिरावलेले फलंदाज बाद झाले आणि एकही धाव काढता आली नाही तोच क्षण निर्णायक ठरला. 

नव्याने मैदानात आलेल्या फलंदाजांना वाढत जाणाऱ्या धावगतीचा पाठलाग करायचा अनुभव नसल्याने हॉंगकॉंगला विजयाला गवसणी घालता आली नाही. पदार्पण करणाऱ्या खलीलने दडपणाखाली चांगली गोलंदाजी केली. बिनबाद 174 धावसंख्येवरून हॉंगकॉंगचा डाव 8 बाद 259 वर रोखला गेला आणि 26 धावांचा विजय हाती लागल्यावर भारतीय खेळाडूंनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.


​ ​

संबंधित बातम्या