Asia Cup 2018 : भारतापुढे बांगलादेश निष्प्रभ

सुनंदन लेले
Friday, 21 September 2018

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा रोहित शर्माचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. बांगलादेशचे प्रमुख फलंदाज झटपट तंबूत परतले. तळात फलंदाजी करताना मेहदी हसनने केलेल्या 42 धावांच्या खेळीमुळे त्यांचा डाव 50व्या षटकापर्यंत लांबला. पण पहिल्याच चेंडूवर बुमराने मुस्तफीझूरला बाद करून बांगलादेशाच्या डावाला पूर्णविराम दिला. 

दुबई : नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा रोहित शर्माचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. बांगलादेशला 173 धावांमधे रोखताना रवींद्र जडेजाने 4 फलंदाजांना तर भुवनेश्वर कुमार आणि बुमराने  प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. विजयाकरता गरजेच्या धावा काढण्याची मुख्य जबाबदारी कर्णधार रोहित शर्माने 83 धावा करून पेलली. सुपर फोर स्पर्धेतला पहिला सामना 7 विकेट्सने जिंकून भारताने अंतिम सामन्याकडे वाटचाल चालू केली. भारताने 

विजयाकरता 174 धावा काढणे भारतीय फलंदाजांना अशक्य कधीच नव्हते. त्यातून रोहित शर्मा आणि शिखर धवनने सहजी फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी रचली. शकीबला स्वीपचा फटका मारताना शिखर पायचित झाला आणि अंबाती रायुडु झेलबाद झाला. रोहित शर्मावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने नेहमीच्या थाटात मोठे फटके मारले. शकीबच्या आखूड टप्प्याच्या चेंडूला रोहितने मारलेले षटकार अफलातून होते. 

रायुडु बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला धोनी ताडताड चालत मैदानात आला तेव्हा प्रेक्षकांनी गलका केला. धोनी आणि रोहित शर्माने मिळून लीलया 64  धावा जमा करून भारताचा मोठा विजय 37व्या षटकातच साकारला. सामना जिंकताना 4 धावा हव्या असताना धोनी 33 वर बाद झाला. विजयी धाव घेत कप्तान  रोहित शर्मा 83  धावांवर नाबाद राहिला  
   
त्या अगोदर बांगलादेश संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. लिंटन दास आणि नझमुल हुसेनला भुवनेश्वर कुमार आणि बुमराने बाद केले. बांगलादेशी फलंदाजीची भिस्त ज्या दोन फलंदाजांवर आहे ते शकीब आणि मुश्फीकुर रहीम मैदानात आले. जडेजाने शकीबला खराब फटका मारताना बाद केल्यावर मुश्फीकूर रहीमवरचे दडपण वाढले. एकदा मुश्फीकूर स्टंपींग होताना वाचला. जडेजाला गरज नसताना रिव्हर्स स्वीपचा फटका मारताना मुश्फीकूर बाद झाला तिथेच बांगलादेशी धावसंख्येला ब्रेक्स लागले. 

एकाचा तोटा तो दुसर्‍याचा फायदा असे म्हणले जाते ते उगाच नाही. हार्दिक पंड्याला दुखापत झाली आणि त्याची जागा रवींद्र जडेजाला देण्यात आली. 2017च्या चँम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर रवींद्र जडेजाला एक दिवसीय संघा पासून लांब ठेवले होते. इंग्लंडमधील शेवटच्या कसोटीत चांगली अष्टपैलू कामगिरी केल्याने निवड समितीला जडेजाला संधी द्यावीशी वाटली. जडेजाने जोरदार पुनरागमन करताना पहिल्याच प्रयत्नात 3 फलंदाजांना बाद करून बांगलादेश संघाला कमी धावांमध्ये रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला. 

अनुभवी फलंदाज बाद झाल्यावर 25 धावा करणार्‍या मेहमदुल्लाने संयमाने फलंदाजी केली म्हणून बांगलादेश डावाला थोडा तरी आकार आला. मेहमदुल्ला पायचित झाला तो पंचांचा निर्णय चुकीचा होता. चेंडू पायावर आदळण्याअगोदर बॅटची कड लागली होती. 7 बाद 101 धावांवर बांगलादेशचा डाव अडखळत असताना लहान चणीच्या मेहदी हसनने जबाबदारी घेतली. कप्तान मुर्तझाबरोबर 66 धावांची भागीदारी करताना मेहदी हसनने 42 धावा केल्या. बांगलादेश संघाला सर्वबाद 173 चा टप्पा गाठून देण्यामागे मेहदी हसनची खेळीच कामी आली. 

विजयाकरता 174 धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांनी फारच सहज पेलून दाखवले.

संबंधित बातम्या