भारतीय कुमार हॉकी संघ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
Thursday, 17 October 2019

- भारतीय कुमार संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियाचे आव्हान 5-1 असे सहज परतवून लावत जोहोर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

- भारताकडून शिलानंद लाक्राने दोन(26, 29वे मिनिट), दिलप्रीत सिंग (44वे), गुरसाहिबजित सिंग (48वे) आणि मनदीप मोर (50वे मिनिट) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला

- साखळीतील अखेरच्या सामन्यात आता भारताची गाठ शुक्रवारी आव्हानवीर ब्रिटनशी पडणार आहे. 

जोहोर बारू (मलेशिया) -  भारतीय कुमार संघाने बुधवारी ऑस्ट्रेलियाचे आव्हान 5-1 असे सहज परतवून लावत जोहोर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 
तमन दाया हॉकी मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताकडून शिलानंद लाक्राने दोन(26, 29वे मिनिट), दिलप्रीत सिंग (44वे), गुरसाहिबजित सिंग (48वे) आणि मनदीप मोर (50वे मिनिट) यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. 
भारताने सामन्याची सुरवात कमालीची आक्रमक केली होती. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या चुकीमुळे त्यांना गोल करण्याची संधी निर्माण झाली होती; पण ऑस्ट्रेलियाच्या रॉबर्ट मॅक्‍लेननमुळे त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यानंतर पहिल्या सत्रात दोन्ही संघ मैदानाच्या मध्यातच खेळत होते. ऑस्ट्रेलियाने आठव्या मिनिटाला कॉर्नर मिळविला. मात्र, तो त्यांना सत्कारणी लावता आला नाही. 
दुसऱ्या सत्रात मात्र सॅम मॅककुलोच याने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. त्यानंतर भारताला पहिला कॉर्नर यशस्वी करता आला नाही. गुरुसाहीचा फटका मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर तीन मिनिटांत शिलानंद लाक्राने दोन गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. 
सामन्याच्या मध्यंतराला भारताने 2-1 अशी आघाडी राखली. उत्तरार्धात भारतीय खेळाडू अधिक आक्रमक खेळले. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून प्रतिआक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली. शिलानंद लाक्रा, सुदीप चिर्माको आणि उत्तम सिंग यांनी ऑस्ट्रलियाच्या बचावफळीवरील दडपण वाढवले. याचा फायदा घेत सहा मिनिटांत तीन गोल करून भारताने आपला विजय निश्‍चित केला. प्रथम दिलप्रीत सिंगने गोल केला. त्यानंतर गुरुसाहिबजित आणि मनदीप मोर यांनी गोल केले. 
साखळीतील अखेरच्या सामन्यात आता भारताची गाठ शुक्रवारी आव्हानवीर ब्रिटनशी पडणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या