''अश्विनच्या गोलंदाजीला सामोरे जाणे आव्हानात्मक होते''  

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोव्हस्कीने पदार्पणातील पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोव्हस्कीने पदार्पणातील पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी केली. विल पुकोव्हस्कीच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामन्यात पदार्पण करताना अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर विल पुकोव्हस्कीने आपण घेतलेल्या परिश्रमामुळेच असा खेळ करता आल्याचे म्हटले आहे. तसेच सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर बोलताना, विल पुकोव्हस्कीने हा दिवस आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगितले. 

राष्ट्रगीत झाल्यावर सिराज झाला भावूक; व्हिडिओ होतोय व्हायरल

विल पुकोव्हस्कीने सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना मिळालेला अनुभव सर्वात मोठा असल्याचे संघात, भारतीय गोलंदाजांची स्तुती केली आहे. टीम इंडियातील फिरकीपटू आर अश्विन बाबत बोलताना, त्याच्या भिन्न गोलंदाजीमुळे अश्विन सर्वात आव्हानात्मक गोलंदाज असल्याचे पुकोव्हस्कीने सांगितले. त्याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गोलंदाजी ऍक्शन वेगळी आहे. मात्र आर अश्विनच्या गोलंदाजीत अधिक व्हेरिएशन असल्याचे विल पुकोव्हस्की म्हणाला. आणि त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाणे आपल्यासाठी खूप आव्हानात्मक होते, असे विल पुकोव्हस्कीने म्हटले आहे. 

त्यानंतर, सिडनीतील विकेट ही फलंदाजांसाठी चांगली असल्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता येणे शक्य असल्याचे विल पुकोव्हस्कीने सांगितले. व या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अधिककरून शॉर्ट बॉलचा वापर केला. मात्र आपण यासाठी पूर्वतयारी केली होती, असा खुलासा विल पुकोव्हस्कीने केला. याशिवाय, दुसऱ्या विकेटसाठी शतकीय भागीदारी करता आल्याचे समाधान असून, अनुभवी लबूशेनसोबत खेळताना आनंद घेतल्याचे विल पुकोव्हस्कीने पुढे सांगितले. 

AUSvsIND 3rd Test D1: पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय; ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत...

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिगने विल पुकोव्हस्कीचे कौतुक करत, त्याने केलेल्या खेळीने आपल्याला प्रभावित केल्याचे म्हटले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला अवघ्या पाच धावांवर चेतेश्वर पुजारा करवी झेलबाद केले. त्यानंतर विल पुकोव्हस्की आणि लबूशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पुकोव्हस्कीने 110 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. अर्धशतकीय खेळी केल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत असलेल्याच नवदीप सैनीने पायचीत केले.           
 


​ ​

संबंधित बातम्या