AUSvsIND : भारतीय संघ व्हाईटवॉश टाळणार का ? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना उद्या कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना उद्या कॅनबेरा येथे खेळवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेत ही एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर आता विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात व्हाईटवॉश पासून वाचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. 

AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे 

कोरोनाच्या काळानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून पहिल्यांदाच आंतराराष्ट्रीय क्रिकेट मध्ये उतरला आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. 

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात देखील अशाच प्रकारचे काहीसे चित्र मैदानात पाहायला मिळाले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताला 51 धावांनी धूळ चारली होती. या सामन्यात देखील प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात करत भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. व भारताचा संघ 50 षटकात आठ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. त्यामुळे भारतीय संघाला मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. इतकेच नाहीतर या पराभवामुळे भारतीय संघाला सलग पाच एकदिवसीय सामन्यात हार मानावी लागली आहे. कोरोनाच्या काळापूर्वी  न्यूझीलंडच्या संघाने भारताला तीनही सामन्यात पराभूत केले होते. 

वन-डेतील वर्चस्व कसोटीतही ठेवण्याचा ऑस्ट्रेलियास विश्‍वास

दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 पहिला सामना मनुका ओव्हल कॅनबेरा येथे 4 डिसेंबर रोजी होणार आहे. तर पुढील दोन सामने सिडनी येथे 6 आणि 8 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी 17 डिसेंबर पासून अ‍ॅडिलेड येथे खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या