सिडनीच्या मैदानात टीम इंडियासोबत घडलेल्या प्रकारावर विराट संतापला

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऍडिलेड आणि दुसरा सामना मेलबर्न मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मैदानावर असे काही घडले ज्यामुळे टीम इंडियाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पुन्हा गालबोट लागले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात येत आहे. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऍडिलेड आणि दुसरा सामना मेलबर्न मध्ये खेळवण्यात आला होता. मात्र तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मैदानावर असे काही घडले ज्यामुळे टीम इंडियाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पुन्हा गालबोट लागले आहे. तिसऱ्या सामन्यात स्टेडियमवरील काही दर्शकांनी भारतीय संघातील काही खेळाडूंवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचे समोर आले. त्यावर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भाष्य करतानाच, या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

AusvsInd : अखेरच्या काही मिनिटांत मिळाले बारा वाजण्याचे संकेत!

सिडनीतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मैदानावर टीम इंडियाचे खेळाडू जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर प्रेक्षकांकडून वर्णभेदी टिप्पणी केल्याची घटना घडली. खेळाडूंवर वर्णभेदी टिप्पणी झाल्यावर टीम इंडियाने शनिवारी अधिकृत तक्रार नोंदविली होती. या तक्रारी नंतर देखील सिडनीच्या मैदानावरील दर्शकांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी पुन्हा संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजवर अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

विराट कोहलीने ट्विट करत, मैदानावर घडलेल्या घटनेकडे तातडीने आणि गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय विराट कोहलीने गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना एकदाचे सरळ केले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यानंतर विराटने जातीय गैरवर्तन पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे आपल्या ट्विटमध्ये नमूद करत, मैदानावरील सीमारेषेवर होत असलेले गैरवर्तन आणि आताची घटना ही उग्र वागणुकीचे परिपूर्ण शिखर असल्याचे लिहिले आहे. तसेच या घटनेमुळे आपल्या वाईट वाटल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. 

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने प्रेक्षकांकडून होत असलेल्या गैरवर्तनावर अधिकृत तक्रार नोंदविली होती. मात्र त्यानंतर देखील मैदानावरील दर्शकांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे आज पुन्हा संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजवर अपशब्द वापरल्याचे पाहायला मिळाले. खेळ सुरु असताना सिराज आणि भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हे मैदानावरील अंपायर पॉल राफेल यांच्याशी प्रेक्षकांच्या वागण्याविषयी बोलताना दिसले. मैदानावर सिराज सीमारेषेवर थांबलेला असताना प्रेक्षकांनी त्याला उद्देशून काही तरी बोलल्याचे दिसले. त्यानंतर मैदानावरील दोन्ही अंपायर यांनी पोलिसांसोबत बोलत काही दर्शकांना मैदानावरून बाहेर जाण्यास सांगितल्याचे आज पाहायला मिळाले. 

दरम्यान, या घटनेवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने चौकशी सुरु केल्याचे आज सांगितले आहे. याशिवाय दर्शकांकडून वापरण्यात आलेल्या अपशब्दांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निषेध करत, हे सहन करण्याच्या पलीकडचे असल्याचे म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबतीत निवेदन जारी करण्यात आले असून, यामध्ये एनएसडब्ल्यू पोलिसांनी काही लोकांची चौकशी केली असल्याचे सांगितले आहे. आणि याशिवाय पालिसांच्या अहवालाची वाट पाहत असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या या निवेदनात नमूद केले आहे. तसेच दर्शकांकडून घडलेल्या या चुकीच्या घटनेवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आपल्या या प्रसिद्धिपत्रकात भारतीय संघाची माफी मागितली आहे.


​ ​

संबंधित बातम्या