विराट म्हणाला, अन्यथा हार्दिकचे स्थान कसोटी संघात नसणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला हार मानावी लागली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाला हार मानावी लागली. मात्र यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवल्यामुळे तीन टी-ट्वेन्टी सामन्यांची मालिका भारताने याअगोदरच आपल्या नावावर केली आहे. तर एकदिवसीय सामन्यातील पहिले दोन विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर आता 17 डिसेंबर पासून या दोन्ही देशांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. परंतु या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मैदानाबाहेर राहणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे. 

AUSvsIND : कोहलीचा ऑस्ट्रेलियात डंका; नावावर झाले 'विराट' रेकॉर्डस्   

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याने दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर त्याने टी-ट्वेन्टी मालिकेत देखील सातत्यपूर्ण खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र टी-ट्वेन्टी मालिकेत हार्दिकला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाल्यानंतर देखील तो कसोटीत उतरणार नसल्याचे कोहलीने म्हटले आहे. एकदिवसीय मालिकेनंतर टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये देखील हार्दिकने खूप चांगली फलंदाजी केल्याचे विराट कोहलीने सांगितले. मात्र कसोटी सामन्यांमध्ये हार्दिक खेळणार असेल तर तो फक्त फलंदाज म्हणून नाही तर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळण्याची गरज असल्याचे विराट म्हणाला. अन्यथा हार्दिकचे स्थान कसोटी संघात नसणार असल्याचे त्याने नमूद केले. 

तिसरा आणि शेवटचा टी-ट्वेन्टी सामना झाल्यानंतर विराट कोहली बोलत होता. यावेळेस त्याने हार्दिकच्या खेळीवर समाधान व्यक्त केले. तसेच संघाला एक नवीन फिनिशर मिळाल्याचे विराटने म्हटले आहे. परंतु कसोटी क्रिकेटची आव्हाने पूर्णपणे वेगळी असून, हार्दिक कसोटीत उतरल्यास त्याच्याकडून गोलंदाजीची गरज भासणार आहे. आणि त्यामुळे संघ अधिक संतुलित होऊ शकतो. शिवाय दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये हार्दिकने गोलंदाजी केल्यामुळे संघ संतुलित झाला होता. 

AUSvsIND 3 T20: जाणून घ्या टीम इंडियाच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टीतील पराभवाची कारणे

तसेच आजचा सामना झाल्यानंतर हार्दिकने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागील चार महिन्यांपासून घरातल्या सदस्यांपासून दूर असून, आता पुढील वेळ कुटुंबासमवेत घालवणार असल्याचे हार्दिक पांड्याने म्हटले आहे. तर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये काही सामन्यांनंतर हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नव्हती. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि टी-ट्वेन्टी मालिकेत देखील हार्दिकने गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला नव्हता.             


​ ​

संबंधित बातम्या