AUSvsIND : कोहलीचा ऑस्ट्रेलियात डंका; नावावर झाले 'विराट' रेकॉर्डस्   

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका 2 - 1 ने आपल्या खिशात घातली आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-ट्वेन्टी मालिका 2 - 1 ने आपल्या खिशात घातली आहे. आज सिडनी येथे झालेल्या तिसर्‍या सामन्यात भारताला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला असला तरी या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने चांगला डाव खेळला. विराटने 61 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकार यांच्या मदतीने 85 धावा केल्या. त्यामुळे टी-ट्वेन्टीच्या क्रिकेट प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची विराटची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी त्याने  नाबाद 90 धावा केल्या होत्या.

AUSvsIND 3 T20: जाणून घ्या टीम इंडियाच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टीतील पराभवाची कारणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज झालेल्या सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. व यासोबतच त्याने टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीतील 25 वे अर्धशतक झळकावले. आणि विराटने ही कामगिरी करताना भारतीय संघाचा सलामीवीर हिटमॅन रोहित शर्माशी बरोबरी साधली आहे. यापूर्वी रोहित शर्माने टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक 25 अर्धशतक केलेले आहेत. त्यानंतर आता विराट कोहली देखील अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू ठरला असून, ऑस्ट्रेलिया संघातील डेव्हिड वॉर्नर 19 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.   

याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध टी-ट्वेन्टी सामन्यात फलंदाजी करताना विराटने सातव्या वेळेस अर्धशतक लगावले आहे. यानंतर वेस्टइंडिज संघाचा खेळाडू ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम यांनी ही कामगिरी केलेली आहे. या दोघांनी प्रत्येकी चार-चार वेळेला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अर्धशतक मारलेले  आहे.    

AUSvsIND 3 T20: अर्धशतकाच्या खेळीसह मॅथ्यू वेडने केला नवा विक्रम  

त्यानंतर विराट कोहलीला एखाद्या संघाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करायला सर्वाधिक आवडते हे सगळ्यांनाच माहित आहे. आणि विराटने यात देखील एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाठलाग करताना विराट कोहलीने 17 व्या वेळेस 50 किंवा त्याहून अधिक धावा केलेल्या आहेत. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या नंबरवर असून, त्याने 12 वेळेस अशी कामगिरी केलेली आहे. तर रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 10 वेळा ही कामगिरी केली आहे. 

आणि याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध त्यांच्याच मायदेशात फलंदाजी करताना विराटने 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. यापूर्वी फक्त भारतीय संघाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा कारनामा केलेला आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याच्याच देशात 3300 धावा केलेल्या आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या