AUSvsIND 2 T20 : सामन्यातील शेवटच्या ओव्हरमधील थरार, पाहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. आणि या विजयासोबतच टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा बदला घेत टी-ट्वेंटी मालिका आपल्या खिशात घातली. सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 195 धावांचे लक्ष्य भारताला दिले होते. भारताने शिखर धवनचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याची वेगवान खेळीमुळे हे लक्ष्य चार गडी गमावत दोन चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

भारताची सुरवात शिखर धवन आणि केएल राहुल या दोघांनी करत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. केएल राहुलला 30 धावांवर अँड्रयू टायने बाद केले. मात्र शिखर धवनने एका बाजूस सावध खेळ करत आपले अर्धशतक केले. केएल राहुल माघारी परतल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसोबत भागीदारी रचली. परंतु ही भागीदारी जास्त वेळ टिकली नाही. शिखर धवनला 52 धावांवर अ‍ॅडम झम्पाने स्वीप्सन करवी झेलबाद केले. शिखर धवन नंतर संजू सॅमसन देखील लवकर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली 40 धावांवर असताना त्याला डॅनियल सॅमने झेलबाद केले. 

विराट कोहली बाद झाल्यावर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर मैदानात होते. आणि यावेळेस भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी लागणारी धावगती वाढली होती. भारताला अखेरच्या15 चेंडूत 35 धावांची गरज होती. यावेळी श्रेयसने तीन चेंडूत एक चौकार आणि एक षटकार खेचला. त्यानंतर शेवटच्या षटकात चौदा धावा आवश्यक होत्या. यातील पहिल्या चेंडूवर हार्दिकने दोन धावा घेतल्या. तर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिडविकेटला उत्तुंग षटकार लगावला. या षटकारानंतर डॅनियल सॅमने उसळता चेंडू टाकल्यामुळे हार्दिकला हा चेंडू निर्धाव जाऊ द्यावा लागला. मात्र त्याच्या पुढील चेंडूवर हार्दिकने पुन्हा एकदा मिडविकेटला षटकार लावून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पंड्याच्या या हार्दिक कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-ट्वेन्टी सामना मंगळवारी आठ तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या