AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्याच्या विजयाची कारणे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भलेही भारताला गमवावी लागली असेल, मात्र याचा बदला भारतीय संघाने टी-ट्वेन्टी मालिकेत घेतला आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भलेही भारताला गमवावी लागली असेल, मात्र याचा बदला भारतीय संघाने टी-ट्वेन्टी मालिकेत घेतला आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात देखील दमदार कामगिरी करत भारताने विजय मिळवला आहे. आणि यासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत 2 - 0 ने आघाडी घेत मालिकेवर कब्जा मिळवला आहे. आज झालेल्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 20 षटकांत पाच गडी गमावत 194 धावा केल्या होत्या. तर भारताच्या संघाने दोन चेंडू शिल्लक असतानाच चार गडी गमावत 195 धावांचे लक्ष्य गाठले. 

AUSvsIND 2 T20 : शिखर धवनचा विक्रम; सुरेश रैनाला टाकले मागे   

1 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने फलंदाजीला उतरत डावाची सुरवात दमदार केली होती. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर वेड आणि शॉर्ट यांनी पहिल्या विकेट साठी 47 धावांची भागीदारी रचली. यावेळी ही भागीदारी टी नटराजनने मोडत भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. टी नटराजनने शॉर्टला अवघ्या नऊ धावांवर माघारी धाडले. यानंतर अर्धशतक करणाऱ्या वेडला विराट कोहलीने धावबाद केले. वेडने 32 चेंडूत दहा चौकार आणि एक षट्काराच्या मदतीने 58 धावा केल्या. 

2 वेड बाद झाल्यानंतर आलेल्या मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत भागीदारी रचली. मॅक्सवेलने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा वेगवान फलंदाजी करत धावा करत असतानाच त्याला शार्दूल ठाकूरने सुंदरकडे झेलबाद केले. मॅक्सवेलने 13 चेंडूत 22 धावा केल्या. यानंतर पुन्हा स्मिथ आणि हेनरिक्स यांनी 48 धावांची भागीदारी करत संघाला दीडशेच्या पार नेले. परंतू मागील सामन्यात बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलने आजच्या सामन्यात पन्नासहून अधिक धावा दिल्या असल्यातरी, त्याने घातक ठरत असलेल्या स्टीव्ह स्मिथला 46 धावांवर रोखले. स्टीव्ह स्मिथनंतर हेनरिक्सला टी नटराजनने झेलबाद केले. तर स्टोयनीस (16) आणि डॅनियल सॅम (8) यांनी 20 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 194 धावांपर्यंत घेऊन गेले.          

3 भारताकडून सर्वाधिक दोन विकेट्स टी नटराजनने घेतल्या. तर शार्दूल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी एक-एक विकेट्स घेतली. मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या धावांवर अंकुश ठेवता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला 194 धावांचा डोंगर उभारता आला.        

4 त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात दमदार झाली होती. भारताच्या डावाची सुरवात शिखर धवन आणि केएल राहुल या दोघांनी करत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची मजबूत भागीदारी केली. यानंतर केएल राहुलला 30 धावांवर अँड्रयू टायने बाद केले. मात्र शिखर धवनने खिंड लढवत आपले अर्धशतक नोंदवले. केएल राहुल माघारी परतल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीसोबत 39 धावांची भागीदारी रचली. परंतु त्याला 52 धावांवर असताना अ‍ॅडम झम्पाने स्वीप्सन करवी झेलबाद केले. शिखर धवन नंतर आलेल्या संजू सॅमसनला आजच्या सामन्यात देखील भरीव कामगिरी करता आली नाही. त्याला मिचेल स्वीप्सनने स्टीव्ह स्मिथ कडे झेलबाद केले. संजू सॅमसनने 10 चेंडूत 15 धावा केल्या.   

5 एकदिवसीय प्रकारातील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याने क्रिझवर पाय टाकत कर्णधार विराट कोहलीसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ही भागीदारी फार काळ टिकवता आली नाही. कारण विराट कोहली 40 धावांवर असताना त्याला डॅनियल सॅमने झेलबाद केले. विराट कोहली बाहेर जात असलेल्या चेंडूवर शॉट मारण्याच्या नादात स्वीप्सनकडे झेल देऊन बसला. मात्र   

6 मात्र यांच्यानंतर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर या दोघांनीही 46 धावांची भागीदारी केली. व भारतीय संघास दोन चेंडू बाकी असतानाच विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने या सामन्यात फिनिशर म्हणून कामगिरी करत षटकार खेचून संघाला जिंकवून दिला. भारताला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्याने डॅनियल सॅमच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर दोन धाव घेतली. तर दुसऱ्या चेंडूवर जबरदस्त षटकार खेचला. यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. आणि मग चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार खेचत पांड्याने संघाला जिंकवून दिले. हार्दिक पांड्याने 22 चेंडूत वेगवान खेळी करत 42 धावा केल्या.    

दरम्यान, यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-ट्वेन्टी सामना मंगळवारी आठ तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या