AUSvsIND 2nd Test : या 5 गोष्टींच्या जोरावर टीम इंडियाने मेलबर्नचे मैदान मारलं

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अ‍ॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करत विजय संपादन केला.

मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार खेळी करत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अ‍ॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या डे नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करत विजय संपादन केला. आणि या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1 - 1 ने बरोबरी साधली आहे. 

अजिंक्यचा खास सन्मान! मानाचं Mullagh Medal पटकावणारा ठरला पहिलाच खेळाडू

1. गोलंदाजांनी केलेली कामगिरी - 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जसप्रीत बुमराहने केलेल्या गोलंदाजीमुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी परतला. बुमराहला फिरकीपटू आर अश्विनने चांगली साथ दिली. तर पदार्पण करत असलेल्या मोहम्मद सिराजने देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठे धक्के दिले. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर जो बर्न्सला खातेही खोलू दिले नाही. जो बर्न्सचा झेल रिषभ पंतने घेतला. त्यानंतर वेडला आर अश्विनने 30 धावांवर रवींद्र जडेजा करवी झेल बाद केले. आणि घातक ठरत असलेल्या लबूशेनला (48) मोहम्मद सिराजने माघारी धाडले. स्मिथ (0) पहिल्या डावात अपयशी ठरला. त्याला आर अश्विनने पुजारा करवी झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होतच राहिले. 

2. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव लवकर आटोपला - 
पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी टिपले. तर अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या मोहम्मद सिराजने दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. गोलंदाजांनी प्रभावी आणि अचूक मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवशीच सर्वबाद झाला. व त्यांचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. 

3. कर्णधार खेळी - 
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव झाल्यानंतर फलंदाजी साठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात फारशी चांगली झाली नाही. कारण मिचेल स्टार्कने सलामीवीर मयांक अग्रवालला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात भागीदारी होत असतानाच, शुभमन गिलला 45 धावांवर पॅट कमिन्सने बाद केले. लागोपाठ पुजाराला (17) देखील कमिन्सने माघारी पाठवले. मात्र एका बाजूला प्रभारी नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेने क्रिझवर चांगलाच जम बसवला. त्याने पहिल्या डावात 223 चेंडूंचा सामना करताना 112 धावा केल्या. यानंतर रवींद्र जडेजाने (57) देखील अर्धशतकीय खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 326 धावा केल्या. 

4. दुसरा डाव पुन्हा गोलंदाजांनी गाजवला -
भारताने पहिल्या डावात 131 धावांची बढत मिळवल्याचा चांगलाच फायदा झाला. आणि अशातच दुसऱ्या डावात गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जो बर्न्सला उमेश यादवने अवघ्या चार धावांवर बाद केले. आर अश्विनने लबूशेनला 28 धावांवर माघारी पाठवले. तर वेडला 40 धावांवर जडेजाने बाद केले. कॅमेरून ग्रीन मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असताना, मोहम्मद सिराजने त्याला बाद करून टीम इंडियाला यश मिळवून दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ एकामोगोमाग एक बाद होत राहिला. आणि ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 200 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 

5. उर्वरित सामना विजय पुन्हा फलंदाजांनी मिळवला - 
भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सगळ्यात जास्त तीन विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. आणि उमेश यादवने एक विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात पुन्हा खराब झाल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर मयांक अग्रवालला 5 धावांवर असताना मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा देखील पॅट कमिन्सचा शिकार ठरला. मात्र शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांनी पुन्हा एकदा भागीदारी रचत भारतीय संघाला आठ विकेट्सने विजय मिळवून दिला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी दोन्ही डावात उत्तम कामगिरी पार पाडल्यामुळे सामन्याच्या चौथ्याच दिवशी टीम इंडियाला विजय मिळवता आला.      


​ ​

संबंधित बातम्या