''कोहली आणि शमीच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका''  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 21 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केल्यानंतर, दुसऱ्या डावात मात्र भारतीय खेळाडूंनी केलेल्या खराब खेळीचा फटका संघाला बसला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केल्यानंतर, दुसऱ्या डावात मात्र भारतीय खेळाडूंनी केलेल्या खराब खेळीचा फटका संघाला बसला. व चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताला गमवावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. पहिल्या डावात फलंदाजी करताना संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या खेळीच्या जीवावर भारतीय संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसऱ्या डावात संपूर्ण टीम अवघ्या 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघावर सर्वच क्षेत्रातून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता उर्वरित सामन्यांमध्ये विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानावर दिसणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघासाठी हे नुकसानकारक असल्याचे मत ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर जो बर्न्सने व्यक्त केले आहे. 

''पुढच्या सामन्यांमध्ये देखील टीम इंडियाचे अवघडच''

ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी पुन्हा मायदेशी परतणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघाची धुरा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. तर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने आगामी दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीची अनुपस्थिती भारतीय संघासाठी फटका असल्याचे जो बर्न्सने म्हटले आहे. हे दोन्ही खेळाडू मालिकेबाहेर जाणे भारतासाठी एक मोठे नुकसान आहे. परंतु उर्वरित संघासमोर देखील दमदार कामगिरी करणे आव्हानात्मक राहणार असल्याचे त्याने पुढे सांगितले. 

तसेच, जागतिक दर्जाच्या खेळाडूची जागा घेणे सोपे नसल्याचे सांगत, विराट कोहलीची जागा कोण घेणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार असल्याचे जो बर्न्स पत्रकारांशी बोलताना म्हणाला. याशिवाय भारतीय संघ जोमाने पुनरागमन करू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मिळालेली लय कायम ठेवावी लागणार असल्याचे जो बर्न्स म्हणाला. 

मानहानीकारक पराभवानंतर आयपीएस अधिकाऱ्याकडून विराटची पाठराखण 

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी सलामीवीर जो बर्न्सच्या फॉर्म विषयी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जो बर्न्स नाबाद अर्धशतकीय खेळी केली होती. त्याने 63 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार यांच्या मदतीने 51 धावा केल्या होत्या.             


​ ​

संबंधित बातम्या