INDvsAUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव; पण कोहलीने केला विक्रम  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवाय त्यासोबतच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासोबतची मालिका देखील गमावली आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात विराट कोहलीने 89 धावांची खेळी केली. त्यामुळे सिडनीच्या क्रिकेट मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची आजची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात विराट कोहलीने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केलेली आहे. मात्र एससीजीवर त्याची खेळी काही खास नव्हती. या मैदानावर विराटच्या नावावर यापूर्वी 21 धावांची नोंद होती. परंतु आजच्या सामन्यात विराटने अर्धशतकासह चांगली खेळी करत हा रेकॉर्ड देखील मोडला आहे. आज झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विराटने केएल राहुलसोबत 72 आणि श्रेयस अय्यर सोबत 93 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयी अपेक्षेला जिवंत ठेवले होते. पण शतकाच्या जवळ येऊन विराट कोहली बाद झाला. त्याला जोश हेझलवूडने हेनरिक्स करवी झेलबाद केले. व तो 89 धावांवर बाद झाला. आजच्या डावात 87 चेंडूंचा सामना करताना विराटने सात चौकार आणि दोन षटकार ठोकले.    

आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सलग दुसऱ्या वेळेस साडेतीनशेहून अधिक धावसंख्या उभारली होती.  एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, लबूशेन व मॅक्सवेल या चारही खेळाडूंनी अर्धशतके झळकावली. तर स्मिथने पहिल्या सामन्यात केलेली आक्रमक खेळी तशीच पुढे सुरु ठेवत 64 चेंडूत 104 धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 389 धावा करत भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याबदल्यात भारतीय संघ 50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला.       

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 375 धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यात कर्णधार  एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली होती. तर भारताचा संघ  50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. या सामन्यात  ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या होत्या. त्याने 5.40 च्या सरासरीने 54 धावा देऊन चार बळी घेतले. यानंतर जोश हेझलवूडने तीन बळी टिपले होते. व मिशेल स्टार्कने एक विकेट घेतली होती.        

 


​ ​

संबंधित बातम्या