AUSvsIND : मरगळ झटकून भारतीय संघाची सरावाला सुरुवात 

शैलेश नागवेकर
Wednesday, 23 December 2020

शुभमन गिलला प्राधान्य, जडेजाकडूनही तंदुरुस्ती सिद्ध 

मेलबर्न : ऍडलेड येथील दारुण पराभवाची मरगळ झटकून नव्या उमेदीने टीम इंडियाने नाताळनंतर दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी नेट प्रॅक्‍टिस सुरू केली. या दुसऱ्या कसोटीत कोणाकोणाला संधी मिळणार याचे संकेत सरावाच्या पहिल्याच दिवशी मिळाले. 

टीम इंडियात होतोय दुजाभाव; भारताच्या माजी महान फलंदाजाचे मोठे वक्तव्य  

हा दुसरा सामना 'बॉक्‍सिंग डे' म्हणजेच 26 तारखेला सुरू होत आहे. ऍडलेडमधील मानहानीकारक कामगिरीनंतर पुढच्या तीन दिवसांत भारतीयांनी मनोबल उंचावले आणि आजपासून प्रत्यक्ष सराव सुरू केला. शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि रिषभ पंत यांना दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्‍यता आज त्यांना सरावात मिळालेल्या प्राधान्यावरून दिसून आली. 

डे-नाईट सराव सामन्यात 43 आणि 65 धावांची खेळी करूनही पहिल्या सामन्यात संधी न मिळालेल्या शुभमन गिलने दुसरा सलामीवीर मयांक अगरवालसह नेटमध्ये सुरुवातीलाच फलंदाजी केली. पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून सहा चेंडू टिकलेल्या आणि दोन्ही वेळा त्रिफाळाचीत झालेल्या पृथ्वी शॉऐवजी गिलला संधी मिळणार हे जवळपास निश्‍चित होत आहे. 

AUSvsIND: तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीची ठिकाणं बदलण्याची शक्यता; वाचा काय आहे कारण?

विराट कोहली मायदेशी परतलेला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केएल राहुल अंतिम संघात खेळणार हे निश्‍चित आहे. मात्र त्याचा क्रमांक कोणता असेल यावर निर्णय झालेला नाही. राहुलला सलामीला खेळवा असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल नेटमध्ये सराव करत होता. राठोड पृथ्वी शॉबरोबरही संवाद साधताना दिसून आला. 

जडेजाची तासभर गोलंदाजी 
पहिल्या कसोटीत अष्टपैलू रवींद्र जडेजाची उणीव भारताला जाणवली होती. अखेरच्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही असे सांगण्यात आले, तरी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो खेळला नव्हता. या दुखापतीतून तो आता पूर्णपणे सावरलेला असल्याचे स्पष्ट झाले. आज त्याने तासभर गोलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीऐवजी जडेजाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

शास्त्रींकडून प्रबोधन 
आजच्या सराव सत्राची सुरुवात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रबोधनातून झाली. नेट सराव सुरू होण्याअगोदर त्यांनी सर्व खेळाडूंशी उत्साह वाढवणारा संवाद साधला. त्यानंतर ते रिषभ पंतशी अधिक चर्चा करताना दिसून आले. यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सराव सामन्यात पंतने 73 चेंडूत 103 धावांची वेगवान खेळी केली होती. महम्मद सिराज नवदीप सैनी यांनी शार्दुल ठाकूरसह अजिंक्‍य रहाणेला गोलंदाजी केली.


​ ​

संबंधित बातम्या