मायदेशी परतला, तेव्हाच रोहितचा दौरा हुकला?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

केवळ कसोटीसाठी निवडलेला जवळपास पूर्ण संघ ऑस्ट्रेलियात आहे. विराट कोहली पितृत्व रजा घेऊन परतणार असल्याने त्याची जागा श्रेयस अय्यर घेणार आहे. या परिस्थितीत रोहित तसेच इशांत शर्मा ऑस्ट्रेलियास कसोटीसाठी जाण्याचा प्रश्‍नच कसा येतो, अशी विचारणा या पदाधिकाऱ्यांनी केली. 

नवी दिल्ली: रोहित शर्माने अमिरातीहून ऑस्ट्रेलियाला थेट जाण्याऐवजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील पुनर्वसन प्रक्रियेस सामोरे जाण्याचे ठरवले, त्यावेळीच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यास जाणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले होते, अशी टिपण्णी भारतीय मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

केवळ कसोटीसाठी निवडलेला जवळपास पूर्ण संघ ऑस्ट्रेलियात आहे. विराट कोहली पितृत्व रजा घेऊन परतणार असल्याने त्याची जागा श्रेयस अय्यर घेणार आहे. या परिस्थितीत रोहित तसेच इशांत शर्मा ऑस्ट्रेलियास कसोटीसाठी जाण्याचा प्रश्‍नच कसा येतो, अशी विचारणा या पदाधिकाऱ्यांनी केली. 

रोहितची तंदुरुस्त चाचणी ११ डिसेंबरला आहे. यानंतरही तो १२ डिसेंबरला लगेच ऑस्ट्रेलियास कसा रवाना होणार. सध्या ऑस्ट्रेलियासाठी विमानसेवा उपलब्ध कुठे आहे. याचबरोबर १४ दिवसांचे विलगीकरण आहे. यामुळे  तो दोनच कसोटीसाठी उपलब्ध होईल. तो कसोटीसाठी संघात नसणार हे आता जवळपास निश्‍चित आहे, असे त्यांनी सांगितले. 
रोहित अमिरातीहून ऑस्ट्रेलियास रवाना होईल, अशीच अपेक्षा होती, पण तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रियेस सामोरा जात आहे.  रोहितला हा सल्ला कोणी दिला, याबाबतही संभ्रम आहे. भारतात परतल्यावर ऑस्ट्रेलियात जाणे अवघड आहे, याची सर्वांनाच कल्पना होती. याचा संघाला फटका बसणार, हे दुर्दैव आहे. अशी खंतही या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

इशांत शर्माला पुनरागमनासाठी  किमान आठ आठवडे लागतील याची कल्पना अकादमीचे मुख्य संचालक राहुल द्रविड यांनी दिली होती. हा कालावधी १७ डिसेंबरला संपतो, याकडेही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

​ ​

संबंधित बातम्या