AUSvsIND : ऑस्ट्रेलियाला व्हॉईटवॉश देण्याची संधी 

शैलेश नागवेकर
Monday, 7 December 2020

भारतीय संघ 2016 मधील दौऱ्याची पुनरावृत्ती करणार? 

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकली असली, तरी भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्‍वास अधिक बळकट करण्यासाठी उद्याचा तिसरा आणि अखेरचा ट्‌वेन्टी-20 सामना जिंकून कांगारूंना त्याच्याच देशात व्हॉईटवॉशची संधी सोडणार नाही. 2016 ची पुनरावृत्ती करण्याचीही ही संधी आहे. 

AUSvsIND : कॅमेरून ग्रीनच्या शतकीय खेळीने ऑस्ट्रेलियाची भारतावर बढत  

2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने ट्‌वेन्टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली होती. तो इतिहास उद्या पुन्हा घडण्याची शक्‍यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्भेळ यश मिळवल्यानंतर आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीय संघाला कसोटी मालिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो. 

AUSvsIND : टी-ट्वेन्टी मालिका विजयानंतर टीम इंडियाला धक्का बसण्याची शक्यता 

ऑस्ट्रेलियात आल्यानंतर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत झालेल्या मोठ्या पराभानंतर भारतीय संघ चांगलाच सावरला आहे. गोलंदाजीत सुधारणा झाली आहे; तसेच फलंदाजही निर्णायक योगदान देत आहेत. भारताला विजयीपथावर ठेवणारा रवींद्र जडेजा अनुपलब्ध असला, तरी भारतीय संघाची विजयी लय कायम राहिली आहे. 

मॅचविनर नटराजन 
गोलंदाजीची प्रमुख मदार असलेल्या जसप्रित बुमरा आणि महम्मद शमी (पहिल्या ट्‌वेन्टी-20 चा अपवाद) यांच्याशिवाय भारतीय संघ जिंकत आहे. नटराजनच्या रूपाने भारताला मॅचविनर मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो तीन सामने खेळला (एक वनडे, दोन टी-20) हे तिन्ही सामने भारताने जिंकलेले आहेत. रविवारच्या सामन्यात एकीकडे इतर गोलंदाज धावा देत असताना नटराजनने चार षटकात अवघ्या एका चौकारासह 20 धावाच दिल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या द्विशतक गाठू शकली नाही. 

ऑस्ट्रेलिया संघाला कर्णधार ऍरॉन फिन्च, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस आणि जोश हॅझलवूड यांची उणीव भासत असली, तरी त्यांच्याकडे चांगल्या खेळाडूंची कमी नाही. रविवारच्या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आणि फिन्चच्या ठिकाणी सलामीला येणाऱ्या बदली कर्णधार मॅथ्यू वेडने तेवढीच आक्रमक फलंदाजी केली होती. तसेच स्टीव स्मिथ आणि ग्लेन मॅक्‍सवेल हे फलंदाज भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेले आहे. 

स्टार्क, कमिंस आणि हॅझलवूडच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीतील ताकद काहीशी कमी झालेली आहे; परंतु सिडनीच्या संथ खेळपट्टीचा फायदा घेणारे त्यांच्याकडे चांगले मध्यमगती गोलंदाज आहेत, म्हणूनच रविवारच्या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले. 

अगरवालला संधी मिळणार 
एरवी विजयी संघात भारतीय बदल करत नाहीत. तसेच आता राखीव खेळाडूंनाही संधी मिळालेली आहे. अपवाद आहे मयांक अगरवालचा. केएल राहुल आत्तापर्यंत सर्व सामने खेळलेला आहे; तसेच कसोटी मालिकेसाठी तो महत्त्वाचा खेळणार असणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अगरवालला संधी मिळू शकते. संजू सॅसमन संघात असल्यामुळे यष्टिरक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या