रोहित शर्माऐवजी श्रेयस अय्यरची निवड?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

ईशांत शर्माही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेस मुकण्याची चिन्हे
 

नवी दिल्ली : अद्यापही तंदुरुस्त नसल्यामुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेस मुकण्याचीच शक्‍यता आहे. रोहित शर्माऐवजी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवडलेल्या मुंबईकर श्रेयस अय्यरची भारताच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्‍यता आहे. 

पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजा घेऊन विराट कोहली मायदेशी परतणार आहे; पण त्याच्याऐवजी बदली खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती. केवळ कसोटीसाठी येणारा रोहित शर्मा विराटची जागा घेईल, अशी अपेक्षा होती; मात्र आता रोहित कसोटी मालिकेसाठीही अनुपलब्ध असल्यामुळे श्रेयसची सुरुवातीस कसोटीसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड होईल. रोहितची अनुपलब्धता निश्‍चित झाल्यावर त्याला अंतिम संघात स्थान देण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

मर्यादित षटकांच्या लढती संपल्यावर केवळ कसोटीसाठी संघात निवडलेले खेळाडू ऑस्ट्रेलियात राहतील, असा निर्णय झाला होता; मात्र आता या सामन्यातील खेळाडू कसोटीसाठी राखीव ठेवता येणार का, हा विचार सुरू आहे. त्यात श्रेयसला ऑस्ट्रेलियातच ठेवण्याबाबत एकमत झाले आहे. विराट, रोहित नसताना एखाद्या फलंदाजास दुखापत झाल्यास प्रश्न निर्माण होतील, हाही विचार करण्यात आला आहे. 

ईशांतऐवजी राखीव खेळाडू ठेवण्याबाबतचा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आला आहे. कसोटीसाठी निवडलेल्या संघात ईशांतसह पाच मध्यमगती गोलंदाज आहेत. ईशांत नसल्यास चार मध्यमगती गोलंदाज उपलब्ध राहतील. संघव्यवस्थापन आणि निवड समिती यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रोहित, ईशांतही अद्याप अनफिट
 

रोहित तसेच इशांत अद्याप तंदुरुस्त नाहीत. त्यामुळे ते २६ नोव्हेंबरपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल होण्याचा प्रश्न सध्या उद्‌भवत नाही. रोहित फार तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियास रवाना होऊ शकेल. त्याच्यावर अद्याप दोन आठवड्याच्या पुनर्वसन प्रक्रिया आवश्‍यक आहे, असे सांगताना सूत्रांनी रोहित अमिरातीतून ऑस्ट्रेलियास थेट रवाना झाला असता, तरच तो खेळण्याची शक्‍यता होती, असेही सांगितले. रोहित फार तर ८ डिसेंबरला रवाना होऊ शकेल. 

शर्माद्वयींसमोरील प्रश्न
    इशांत आणि रोहित काही दिवसांत ऑस्ट्रेलियास रवाना झाले, तरी ते सराव सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे थेट पहिल्या कसोटीत खेळवण्याचा धोका.
    भारतीय संघाचा विलगीकरणात असतानाही सराव; पण रोहित इशांतला ही सुविधा नसेल
    भारतीय संघ अमिरातीतील जैवसुरक्षित वातावरणातून ऑस्ट्रेलियात तर रोहित आणि इशांत सध्या असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत.


​ ​

संबंधित बातम्या