स्टीव स्मिथसाठी सचिनचा मंत्र

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

अगोदर शफल करत असल्याने पाचव्या यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करा!
 

india tour of australia 2020  क्रिकेटच्या पुस्तकात न सापडणारी शैली, तरीही धावांचा पाऊस सातत्याने पाडत असलेल्या स्टीव स्मिथला रोखण्यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय गोलंदाजांना ट्रॅप सुचवला आहे. पाचवी यष्टी जेथे असते, त्या दिशेने गोलंदाजी करा. त्यामुळे अगोदरच शफल करणाऱ्या स्मिथला हे चेंडू खेळणे कठीण जाईल, असे सचिनचे म्हणणे आहे.

ऑस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार भारतीयांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. सहा शतके आणि एक 92 धावांची खेळी त्याने केलेली आहे. भारताच्या गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मिथ आणि वॉर्नर खेळले नव्हते. त्यामुळे भारताला ती मालिका जिंकणे सोपे गेले होते.

साधारणतः कसोटी सामन्यात आपण उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर मारा करण्याचा सल्ला देत असतो; परंतु चेंडू टाकण्याच्या अगोदरच स्मिथ पायाची हालचाल करत असल्यामुळे त्याला आणखी बाहेर म्हणजेच पाचव्या यष्टीच्या दिशेने गोलंदाजी करणे योग्य ठरेल, असे सचिनचे म्हणणे आहे.

या वेळी करावा डाव घोषित

ॲडलेड येथे प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. याबाबत बोलताना सचिन म्हणाला, प्रत्येक सत्र वेगवेगळ्या वेळेस सुरू होते. पहिल्या सत्रात सूर्यप्रकाश असताना खेळपट्टी चांगली असते. त्यामुळे याच सत्रात जास्तीत जास्त धावा करायला हव्यात. संधीप्रकाश आणि रात्री गुलाबी चेंडू अधिक स्विंग होऊ लागतो, अशा वेळी गोलंदाजी करणे उत्तम असते. त्यामुळे अशी वेळ साधूनच आपला डाव घोषित करावा. 

असा आहे मार्ग...
    उसळत्या चेंडूवर स्मिथ अडचणीत सापडतो, हे आता जगजाहीर आहे. त्यामुळे आता तो अशा चेंडूंसाठी तयार राहील; परंतु अशा वेळी उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू टाकून त्याची क्षमता पाहावी, तसेच बॅकफूटवर टाकून त्याला चुका करण्यास भाग पाडावे, असे सचिनने सुचवले आहे.

 स्विंग होणारा यॉर्कर चेंडू स्मिथसाठी उपयुक्त ठरेल का, या प्रश्‍नावर सचिन म्हणतो, हा प्रयोग करण्यापूर्वी चेंडू किती स्विंग होतो, हे पाहावे लागेल. आता तर चेंडूला लाळ लावता येणार नाही. खेळपट्टी जिवंत असेल, तर हा प्रयोग करायला हरकत नाही.


​ ​

संबंधित बातम्या