हिटमॅन फिट है! टेस्ट पास झालेला रोहित प्लाइट कधी पकडणार?

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

17 डिसेंबरपासून भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना रंगणार आहे.

Rohit Sharma passes fitness test भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) ने शुक्रवारी रोहितच्या फिटनेससंदर्भात माहिती दिली. आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. परिणामी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यास मुकावे लागले होते. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 100 टक्के फिट नाही, त्यामुळे त्याची निवड करण्यात आली नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. फिटनेसनंतर रोहित शर्मा कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? यासंदर्भात अद्याप कोणतीही बातमी समोर आलेली नाही. 

आयपीएलदरम्यान रोहित शर्माच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यानंतर तो संघ मार्गदर्शक रवी शास्त्री आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची सूचना नाकारून आयपीएल सामन्यात खेळताना दिसला. त्यानंतर त्याच्या संघनिवडीवरूनही नाट्य झाले. त्यातच रोहित शर्मा थेट भारतात परतणार असल्याची कल्पना नव्हती, अशी टिप्पणी कर्णधार विराट कोहलीने केली होती. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. 

पीटीआयने एका बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव न घेता दिलेल्या वृत्तानुसार, 14 नोव्हेंबरला रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पहिल्या दोन सामन्याला त्याला मुकावे लागणार असून दोन सामन्यात तो भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल. कारण त्याला 14 दिवसांचे विलगीकरण संपल्यावर तो अखेरच्या दोन कसोटींसाठीच उपलब्ध होऊ शकेल. तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनीत होणार आहे. रोहित संघात हवा, असे अनेक क्रिकेट अभ्यासकांचे मत होते. संघात आल्यास रोहित डावास सुरुवात करण्याची शक्‍यता आहे.


​ ​

संबंधित बातम्या