AUSvsIND : भारताच्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती? 

संजय घारपुरे
Wednesday, 2 December 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती असण्याची शक्‍यता आहे.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्‌वेंटी 20 लढतीस हाऊसफुल उपस्थिती असण्याची शक्‍यता आहे. ही लढत सिडनीत 8 डिसेंबरला आहे. 

सिडनीत असलेल्या न्यू साऊथ वेल्स प्रशासनाने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील निर्बंध दूर केले आहेत. राज्यात तीन आठवड्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे सुरक्षित अंतराचे पालन करण्यासाठी असलेल्या नियमात शिथिलता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होईल, त्यामुळे अखेरच्या ट्‌वेंटी 20 लढतीच्यावेळी 48 हजार क्षमतेचे सिडनी क्रिकेट ग्राऊंड हाऊसफुल होण्याची शक्‍यता आहे. 

AUSvsIND : जाणून घ्या टीम इंडियाच्या एकदिवसीय मालिका पराभवाची कारणे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्‌वेंटी 20 मालिका शुक्रवारपासून होईल. सलामीचा सामना कॅनबेरातील मनुका ओव्हल मैदानावरच होईल. त्यानंतरच्या दोन लढती सिडनीत होणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील या सामन्यासाठी क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवेशच देण्यात आला होता. ही सर्व तिकिटे काही तासांत संपली होती. त्यामुळे तिसऱ्या सामन्याची उर्वरित 50 टक्के तिकिटेही सहज संपण्याचा अंदाज आहे. 

पूर्ण क्षमतेने तिकीट विक्रीस मंजुरी मिळाल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया खूष आहेत. जैवसुरक्षित उपाययोजना, तसेच प्रेक्षक मर्यादेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियास 8 कोटी 80 लाख डॉलरचा फटका बसला आहे. आता तिसरी कसोटीही सिडनीत होणार असल्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची ऑस्ट्रेलियास आशा आहे. 

विक्रमी उपस्थिती ऑस्ट्रेलियात 
ब्रिस्बेन येथे गेल्या महिन्यात झालेल्या क्वीन्सलॅंड - न्यू साऊथ वेल्स या रग्बी लढतीस 49 हजार 155 चाहते उपस्थित होते. कोरोनाच्या ब्रेकनंतरची ही सर्वाधिक उपस्थिती होती.


​ ​

संबंधित बातम्या