AUSvsIND : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत (फोटो)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरवात झाली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरवात झाली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना फिंच आणि स्मिथ यांनी केलेल्या शतकीय खेळीमुळे भारतासमोर 375 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ  50 षटकात आठ गडी गमावून 308 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि फिंच या दोघांनी मिळून पहिल्या विकेट साठी 156 धावांच्या भागीदारीची नोंद केली. डेव्हिड वॉर्नरने 69,  फिंचने 114 धावा केल्या. 

डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर आलेल्या स्मिथने देखील आजच्या सामन्यात दमदार खेळी केली.  स्मिथ आणि फिंच या दोघांनी मिळून 108 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथने 62 चेंडूत शतक पूर्ण केले.या दरम्यान स्टीव्ह स्मिथने 10 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार लगावले. तर आज फलंदाजी करताना स्मिथने 66 चेंडूत 105 धावा केल्या.\

त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा धावफलक चालूच ठेवला.  ग्लेन मॅक्सवेल 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 375 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 53 धावा केल्या. मात्र त्यानंतर मयांक अग्रवाल जोश हेझलवूडचा शिकार ठरला. त्याने 18 चेंडूत 22 धावा केल्या. 

मयांक बाद झाल्यावर क्रिझवर आलेल्या विराट कोहलीला आजच्या सामन्यात फारसा खेळ करता आला नाही.  विराट कोहली एक धावांवर असताना ऍडम झम्पाने त्याचा झेल सोडला. मात्र त्याचा फायदा  विराटला घेतला आला नाही. विराट कोहलीला जोश हेझलवूडने फिंच करवी झेलबाद केले. 

हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. परंतु शिखर धवन 79 धावांवर बाद झाला. पण हार्दिकने जबाबदारीने आपला खेळ सुरु ठेवला होता. 


हार्दिक पांड्याला ऍडम झम्पाने स्टार्क करवी झेलबाद केले. तो 90 धावांवर बाद झाला. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 29 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.   


​ ​

संबंधित बातम्या