AUSvsIND : खरा सामनावीर मी नाही नटराजन : हार्दिक पंड्या 

संजय घारपुरे
Monday, 7 December 2020

हार्दिक पंड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या ट्‌वेंटी 20 लढतीसह मालिका विजयही निश्‍चित केला.

हार्दिक पंड्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या ट्‌वेंटी 20 लढतीसह मालिका विजयही निश्‍चित केला. हार्दिकची सामनावीर म्हणून निवड झाली, पण त्याने खरे सांगतो सामनावीर मी नाही तर नटराजन होता असे सांगितले. 

AUSvsIND T20: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा...

नटराजनने चार षटकांत केवळ 20 धावा देताना दोघांना बाद केले. त्याने वाचवलेल्या 15 धावांचा विजयात मोलाचा वाटा होता. तो कमाल खेळाडू आहे. नेमके काय करायचे याची त्याला जाणीव असते. गोष्टी सरळ-साध्या ठेवणे त्याला तसेच मलाही आवडते. सामन्यागणिक त्याच्या गोलंदाजीत सुधारणा होत आहे असे हार्दिकने सांगितले. 

लॉकडाऊनमध्ये कसून तयारी करीत होतो. संघाला खरी गरज असेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करून सामना जिंकून देण्याइतकी तयारी हवी, असे मी कृणालला सांगत असे. काही सामन्यांत मला तसे करता आले याचा आनंद आहे, असे हार्दिकने सांगितले. अखेरच्या षटकात जास्त लांब अंतरावर चेंडू मारण्याचे आव्हान असेल याची कल्पना होती. पण पट्ट्यात चेंडू असेल, बॅटवर योग्य जागी लागला, तर सीमारेषा किती दूर आहे याचा फरक पडत नाही. संघ जिंकल्यावरच हे लक्षात येते. सामना जिंकून देऊ शकलो याचे जास्त समाधान आहे, असेही तो म्हणाला. 

AUSvsIND 2 T20 : सामन्यातील शेवटच्या ओव्हरमधील थरार, पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियातील धावांमुळे मला कसोटी संघात घेण्याची चर्चा सुरू होईल, पण मर्यादित षटकांचे सामने आणि कसोटी सामने यात फरक आहे. कसोटीत फलंदाजी करणे मला आवडेल, पण तो निर्णय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा आहे असेही तो म्हणाला.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-ट्वेन्टी सामना मंगळवारी आठ तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या