AUSvsIND 3rd Test: व्वा रे वाघा! जखमी होऊनही कांगारूंना फोडला घाम!

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने लक्षणीय खेळी करत सामना अनिर्णित ठरवला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने लक्षणीय खेळी करत सामना अनिर्णित ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या अनेक माजी खेळाडूंनी  आणि खासकरून रिकी पॉन्टिगने टीम इंडिया दुसऱ्या डावात 200 धावा करणे देखील कठीण असल्याचे म्हटले होते. मात्र याउलट भारतीय संघाने दुसऱ्या डावात शेवटचा आणि पाचवा दिवस संपेपर्यंत पाच गडी गमावत 334 धावा केल्या. आणि त्यामुळे भारतीय संघाने तिसरा सामना ड्रॉ केला. हनुमा विहारी आणि आर अश्विन या सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद राहिले. हनुमा विहारी दुखापतग्रस्त असताना देखील त्याने तीन तासाहून अधिक फलंदाजी करताना कांगारूंच्या सहा गोलंदाजांना घाम फोडला. 

AusvsInd : नडण्यापेक्षा लढले अन् ड्रॉ करुनही जिंकले!

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावत 312 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर कांगारूंनी आपला डाव घोषित केला होता. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 407 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात दुसऱ्या डावात चांगली झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार ओपनिंग केल्याचे पाहायला मिळाले. परंतु चौथ्या दिवशीच्या अखेरीस रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यामुळे सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकतो की काय असे वाटत असतानाच, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत यांनी केलेली धमाकेदार खेळी व शेवटी हनुमा विहारी व अश्विनची चिवट फलंदाजीमुळे सामना अनिर्णित राहिला. 

पंत 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार; तिसरे टेस्ट शतक 3 धावांनी हुकलं

सामन्याच्या पाचव्या दिवशी विशेषकरून हनुमा विहिरीने मैदानावर टिकून संघाची पडझड रोखली. हनुमा विहारीने हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यानंतर फिजियोची मदत घेत पुन्हा झुंझार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 161 चेंडूंचा सामना करताना चार चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. भारतीय संघाची धावसंख्या 272 असताना चेतेश्वर पुजाराला जोश हेझलवूडने बाद केले. चेतेश्वर पुजारा 77 धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर हनुमा विहारी आणि अश्विन या दोघांनी 62 धावांची भागीदारी करत सामना संपेपर्यंत संघाची धावसंख्या 334 पर्यंत पोहचवली. टी ब्रेक मध्ये दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहिरीने शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहून पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. 

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. तर ऍडिलेड येथे झालेला पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकला होता. व मेलबर्न येथे झालेला दुसऱ्या बॉक्सिंग डे सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे टीम इंडियाला मालिका जिंकण्याची अजून एक संधी असून, आता शेवटचा आणि चौथा सामना ब्रिस्बेन मध्ये खेळवला जाणार आहे.          


​ ​

संबंधित बातम्या