AUSvsIND : जाणून घ्या दुसऱ्या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  एकदिवसीय मालिकेतून मैदानात उतरला होता.

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या  एकदिवसीय मालिकेतून मैदानात उतरला होता. आणि या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवण्यात आला. व या सामन्यात देखील भारतीय संघाने कांगारूंसमोर लोटांगण घातल्याचे चित्र पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया सोबतच्या दुसऱ्या सामन्यात भारताला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.    

स्टेडियमध्ये रंगला प्रेमाचा खेळ; भारतीयाने ऑस्ट्रेलियन महिलेला केलं प्रपोज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. व त्यानंतर भारतासमोर 390 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा संघ 50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली आहे.  

1. ऑस्ट्रेलिया सोबतच्या दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाची सुरवातीची फळी मोडण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (83) आणि फिंच (60) यांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावा जोडल्या. यानंतर आलेल्या स्मिथने आजच्या सामन्यात देखील दमदार खेळी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखले. स्मिथने त 64 चेंडूत 104 धावा कुटल्या. व त्यानंतर लबूशेन व मॅक्सवेल यांनी अर्धशतकीय खेळी केली. पहिल्या सामन्याप्रमाणे मॅक्सवेलने आज पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलने 29 चेंडूत 63 धावा केल्या. 

2. ऑस्ट्रेलियासोबतच्या दुसऱ्या सामन्यात  भारताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट्स, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या होत्या.तर आजच्या सामन्यात एकही गोलंदाज चालला नाही. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 4 बाद 389 धावा केल्या.  

3. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 390 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात पुन्हा अडखळत झाली. भारताचे सलामीवीर शिखर धवन (30) आणि मयांक अग्रवाल (28) या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 58 धावा केल्या. मात्र त्यानंतर या दोघांनाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर देखील पुन्हा अपयशी ठरल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. त्याला हेनरिक्सने स्मिथ करवी 38 धावांवर झेलबाद केले.   

4. शिखर धवन, मयांक अग्रवाल व श्रेयस अय्यर माघारी परतल्यावर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पडझड रोखत संघाची खिंड लढविली. परंतु विराट कोहलीला जोश हेझलवूडने हेनरिक्स करवी झेलबाद केले. कोहली 89 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलला देखील ऍडम झम्पाने झेलबाद केले. 

5. कोहली आणि केएल राहुल या जोडीला बाद केल्यानंतर मागील सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला (28) पॅट कमिन्सने बाद केले. व रवींद्र जडेजा (24) देखील पॅट कमिन्सचा शिकार झाला. यानंतर मोहम्मद शमी आणि बुमराह लगेच बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ 50 षटकात नऊ गडी गमावून 338 धावांपर्यंतच मजल मारू शकला.  

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 2 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.


​ ​

संबंधित बातम्या