बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलची कमाल; वाचा नेमके काय घडले   

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

कन्कशन सबस्टिट्यूटचा सर्वात पहिल्यांदा वापर न्युझीलंडने स्थानिक क्रिकेट मध्ये केला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-ट्वेन्टी सामना आज खेळवण्यात आला. यापूर्वीच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे टी-ट्वेन्टी मालिकेची सुरवात विजयाने करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या जोरावर 20 षटकांत 161 धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने डावाची चांगली सुरवात करत भारताची धाकधूक वाढवली होती. मात्र बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या यूजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलेच धक्के दिले. आणि संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. 

AUSvsIND T20 : लक्षणीय कामगिरी करत रवींद्र जडेजाने मोडला धोनीचा रेकॉर्ड  

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा गोलंदाजी घेतल्यानंतर भारतीय संघाची सुरवात अडखळत झाल्याचे पाहायला मिळाले. तरी देखील केएल राहुलने केलेले अर्धशतक आणि रवींद्र जडेजाने केलेली वेगवान खेळी यामुळे भारतीय संघ 161 धावांपर्यंत पोहचू शकला. परंतु फलंदाजी दरम्यान रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. मिशेल स्टार्कच्या 18व्या षटकात रविंद्र जडेजाला चेंडू लागल्यामुळे तो फिल्डिंग साठी मैदानात येऊ शकला नाही. यानंतर त्याच्या बदल्यात मैदानात आलेल्या यूजवेंद्र चहलने गोलंदाजी केली. क्रिकेट मधील कन्कशन सबस्टिट्यूटमुळे प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसलेल्या यूजवेंद्र चहलला आजच्या सामन्यात गोलंदाजी करता आली. व त्याने मिळालेल्या या संधीचे सोने करत ऑस्ट्रेलियाच्या तीन गडयांना तंबूत पाठवले.    

कन्कशन सबस्टिट्यूटचा सर्वात पहिल्यांदा वापर न्युझीलंडने स्थानिक क्रिकेट मध्ये केला होता. यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने देखील याचा वापर 2018 पासून स्थायिक क्रिकेट मध्ये करण्यास सुरवात केली. आणि त्यानंतर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) देखील या नियमाचा स्वीकार केला. व ऑगस्ट 2019 पासून याची अंमलबजावणी सुरु केली. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांकडून 'लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट'चा निर्णय घेण्यात येऊ लागला.         

भर मैदानात प्रपोज करणाऱ्या 'दीपेन'ने सांगितली लव्ह स्टोरी 

कन्कशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार सामनाधिकारी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडूला मैदानात उतरवण्यास परवानगी देतात. आणि हा खेळाडू नेहमीच्या खेळाडूप्रमाणे गोलंदाजी अथवा फलंदाजी करू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी चहलला मैदानात उतरविण्यास परवानगी देण्यात आली. आणि त्याने देखील चार षटक टाकत  25 धावा देऊन तीन बळी मिळवले. यात चहलने अ‍ॅरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड सारख्या फुलफॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला.     

दरम्यान, यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-ट्वेन्टी सामना रविवारी सहा तारखेला सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. 
 

 


​ ​

संबंधित बातम्या