पॅटर्निटी लिव्ह साठी कर्णधार विराट कोहली मायदेशी रवाना 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून पुन्हा मायदेशी परतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून पुन्हा मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची धुरा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे सोपवून विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी माघारी रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियामधून रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने संघातील सहकाऱ्यांशी भेट घेत मालिकेतील तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. आणि त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1 - 0 अशी बढत घेतली आहे. 

क्रिकेटपटू युझवेंद्र चहल अडकला विवाहबंधनात 

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहलीने पॅटर्निटी लिव्ह साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) परवानगी मागितली होती. व त्याची ही परवानगी बीसीसीआयने मंजूर केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सोबतच्या तीन एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर खेळवण्यात येत असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर विराट उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी अनुपस्थित राहणार आहे. तर या सामन्यांसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजिक्य रहाणे कडे सोपविण्यात आलेली आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत 191 धावांवर रोखले होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 36 धावांवर बाद झाला होता. आणि त्यामुळे संघाला हार मानावी लागली होती. ऑस्ट्रेलियासोबतचा दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना सिडनीत 7 जानेवारीला आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेन मध्ये खेळवला जाणार आहे. 

''वेळ आणि स्थानिक नियमांबाबत माहिती नसल्यामुळेच असे घडले'' 

याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया सोबतच्या आगामी तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीसह भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील अनुपस्थित राहणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मोहम्मद शमीच्या हाताला चेंडू लागल्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. आणि त्यामुळे तो संघाबाहेर गेला असून, त्याच्या जागी मोहम्मद सिराजला कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.       


​ ​

संबंधित बातम्या