"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"
सिडनी कसोटीपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात नियोजित ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्याची चर्चा सुरु झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलंड राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोरपणे नियमाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी याठिकाणी रवाना झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंना क्वारंटाईनच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ यासाठी तयार असला तरी भारतीय संघ निर्बंधात वावरण्यासाठी राजी नसल्याचे प्रसारमाध्यमातील बातम्यातून समोर येत आहे.
क्वारंटाईन होणार असाल तरच खेळायला या; टीम इंडियाला इशारा
क्वीन्सलंडच्या राज्य सरकारने टीम इंडियाला इशारा दिल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हेडिन याने भारतीय संघाला टार्गेट केले आहे. भारतीय संघाला ब्रिस्बेनच्या मैदानावर पराभव दिसत असल्यामुळेच संघ याठिकाणी खेळण्यास तयार नाही, असा तर्क हेडिनने लावला आहे. गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाचे रेकॉर्ड चांगले असून याठिकाणी यजमान संघाला पराभूत करणे कोणत्याही संघाला जमलेलं नाही. भारतीय संघाला या रेकॉर्डचीच धास्ती वाटत असावी, असे मत ब्रॅडिनने व्यक्त केले आहे. फॉक्स क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हेडिनने भारतीय संघाला लक्ष्य केले. मात्र बायो-बबलमध्ये खेळाडूंना थकवा जाणवत असेल, असा उल्लेखही त्याने केला.
ब्रॅड हेडिन नेमकं काय म्हणाला
ब्रॅड हेडिन म्हणला की, भारतीय संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धेपासून बायो-बबल मध्ये आहेत. जी परिस्थिती भारतीय खेळाडूंची आहे अगदी त्याच वातावरणातूनच ऑस्ट्रेलियन संघही जात आहे. पण त्यांना नियमातून खेळायला मैदानात उतरायचे नाही. ऑस्ट्रेलियन संघाला नियमानुसार खेळण्यास तयार आहे, असेही ब्रॅड हेडिनने म्हटले आहे.
भारतीय संघ ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासंदर्भात विचार करत असतानाच क्वीन्सलंड सरकारने टीमला इशारा दिला आहे. क्वीन्सलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी नियम पाळायचे नसतील तर इकडे येऊच नका, असे सांगत सर्वांना जे नियम आहेत त्यातून सुटका होणार नाही, याचे संकेत दिले आहेत.
1931 पासून ब्रिस्बेनमध्ये एकूण 62 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील तब्बल 40 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. 13 सामने अनिर्णित राहिले असून 1960 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना टाय झाला होता. ऑस्ट्रेलियाला केवळ 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने सर्वाधिक चारवेळा, वेस्ट इंडिजने तीन वेळा तर न्यूझीलंडने या मैदानात एकदा ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. 1947 पासून चे 2014 पर्यंत भारतीय संघाने ब्रिस्बेनच्या मैदानात 5 सामने खेळले असून सर्वच्या सर्व सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.