AusvsInd Sydney Test : गरज पडल्यास पेन किलर इंजेक्शन घेऊन जडेजा बॅटिंग करणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि सैनी यांच्याकडून खूप अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. त्यामुळेच यांच्यापूर्वी रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पंत-पुजाराच्या दमदार भागीदारीच्या रुपात भारतीय संघाने अखेरच्या दिवसातील पहिले सत्र गाजवले. पंत शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. लायनने त्याला 97 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर हेजलवूडने पुजाराला 77 धावांवर तंबूचा रस्ता दाखवत मॅच पुन्हा आपल्या बाजूनं झुकवली आहे. सध्याच्या घडीला सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. पुजारा बाद झाल्यानंतर अश्विन मैदानात उतरलेला आहे. 

सिडनी कसोटीतील पहिल्या डावात मिचेल शॉर्ट लेंथ चेंडूमुळे जडेजाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे पहिल्या डावात चार विकेट घेणाऱ्या जडेजाने गोलंदाजी केली नव्हती.  त्यामुळे दुखापतीमुळे तो बॅटिंग करणार का? यासंदर्भात संभ्रम आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार दुखापतीमुळे भारत दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्याला जडेजाला मुकावे लागणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या सामन्यातही तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या अटीतटीच्या परिस्थितीत जडेजा वेदना कमी करणारे इंजेक्शन घेऊन मैदानात उतरु शकतो, असे वृत्त आहे. 

AusvsInd Brisbane Test News : ट्विस्ट संपले; चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्येच!

सध्याच्या घडीला अर्धा संघ तंबूत परतला आहे. हनुमा विहारी आणि अश्विन यांच्यानंतर भारताकडे चांगली बॅटिंग करु शकतील असे खेळाडू नाहीत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि सैनी यांच्याकडून खूप अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. त्यामुळेच यांच्यापूर्वी रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. दुखापतीनंतर मोठी जोखीम घेऊन तो  मैदानात उतरण्याची वेळ येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.     

 


​ ​

संबंधित बातम्या