Ausvs Ind 3rd Test Day 2 : दुसरा दिवस जडेजा, स्मिथ अन् गिल या त्रिकूटानं गाजवला!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि गेल्या दोन कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेला स्मिथने मालिकेतील पहिले वहिले शतक झळकावले.

Australia vs India  3rd Test :  रविंद्र जडेजाची फिरकी आणि बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंचा संघ 338 धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीनं अर्धशतकी भागीदारी पूर्ण करुन भारतीय संघाला आणखी मजबूती दिली. रोहित शर्मा मोठी खेळी करेल, असे दिसत असताना हेजलवूडने त्याच्या रुपात टीम इंडियाला 70 धावांवर पहिला धक्का दिला. यात 15 धावांची भर पडल्यानंतर अर्धशतकी खेळी करुन शुभमन गिलही बाद झाला.  कमिन्सने त्याची विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघाने 2 बाद 96 धावा केल्या होत्या. अजूनही टीम इंडिया ऑस्ट्रेलियन टीमपेक्षा 242 धावांनी पिछाडीवर आहे.  

सिडनीत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला झटपट विकेट मिळवण्यात यश मिळवले. लाबुशेने आणि स्मिथ यांनी 2 बाद 166 वरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळ सुरु केला. धावफलकावर 206 धावा असताना शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मार्नस लाबुशेनला जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 196 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 91 धावा केल्या. स्मिथ-लाबुशेन जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. रविंद्र जडेजाने मॅथ्यूच्या रुपात कांगारुंना चौथा धक्का दिला. तो 13 धावा करुन परतला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कॅमरुन ग्रीनला बुमराहने खातेही उघडू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारालाही बुमराहने अवघ्या एका धावेवर चालते केले.  

जेव्हा लाबुशेन सामना सुरु असताना हिटमॅनला विचारतो क्वारंटाईनमध्ये काय केलं

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि गेल्या दोन कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेला स्मिथने मालिकेतील पहिले वहिले शतक झळकावले. त्याने 226 चेंडूत 131 धावांची खेळी केली. त्याला धावबाद करत जडेजाने ऑस्ट्रेलिया पहिला डाव खल्लास केला. तळाच्या फलंदाजीत स्टार्कने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 30 चेंडूत 24 धावा केल्या. सैनीने त्याला तंबूत धाडले. नॅथन लायनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला जडेजाने नववा धक्का दिला. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. बुमराह-सैनी प्रत्येकी 2-2 आणि सिराजला 1 विकेट मिळाली. 


​ ​

संबंधित बातम्या