Aus v Ind : बुमराह-सिराजला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

सामना सुरु असताना प्रेक्षकांतून घडलेल्या प्रकारानंतर बुमराह मैदानात भारतीय स्टाफ सदस्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळाले होते.

सिडनीच्या मैदानात सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वर्णद्वेषात्मक टिप्पणी करण्यात आली. या मुद्यावरुन भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी यावर  नाखूश असून यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.  

या सोबतच भारतीय क्रिकेट मंडळाच्या स्टाफ सदस्यांसह बुमराह आणि सिराज यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतची या मुद्यावरुन चर्चा केली आहे. सामना सुरु असताना प्रेक्षकांतून घडलेल्या प्रकारानंतर बुमराह मैदानात भारतीय स्टाफ सदस्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळाले होते. भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं प्रेक्षकाकडून झालेला गैरवर्तनाची माहिती मैदानातील पंच पॉल विल्सन आणि पॉल रिफेल यांना दिली होती.  

AusvsInd Test : टीम इंडियाला जिथं खेळायचं नव्हतं ते शहर झालं लॉकडाऊन

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित संख्येतच प्रेक्षकांना सामन्यासाठी प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकामधून कोण-काय बोलते हे स्पष्टपणे खेळाडूला समजून येते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यू साउथ वेल्स आयसीसीला सीसीटीव्ही फुटेज मिळवून देण्यासाठी मदतही करत आहे. 

AusvsInd : दिवसाअखेर पारडे पुन्हा कांगारुकडे झुकलं; स्मिथ-लाबुशेन डोकेदुखी वाढवणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यांतील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांनी मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली असून हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.  मात्र या प्रकरणामुळे खेळाला गालबोट लागले आहे. खेळाच्या मैदानात वर्णद्वेषाचा मुद्दा नवा नाही. यापूर्वीही मैदानात हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. न्यूझीलंडमध्ये इंग्लंडच्या संघातील जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. यावेळी संबंधित प्रेक्षकाला शोधून त्याच्यावर आंतरराष्ट्रीय सामना पाहण्यावर बंदी करण्यात आली होती.  त्यामुळे याप्रकरणात नेमके काय होतेय हे पाहावे लागेल.


​ ​

संबंधित बातम्या