AusvsInd: सिराजच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावून वॉर्नर फसला!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

वॉर्नरच्या रुपात सिराजने भारतीय संघाला पहिल्याच सत्रात मोठं यश मिळवून दिले. 

Ausvs Ind 3rd Test Day 1: सिडनीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वॉर्नरच्या कमबॅकमुळे पाहुण्या कांगारुंची ताकत वाढल्याचे बोलले जात होते. मात्र डेविड वॉर्नरला आक्रमक खेळी करता आली नाही. खेळाच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराजच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याने छेडखानी केली आणि आपली विकेट अवघ्या 5 धावांवर गमावली. त्याने कोणत्याही हालचालीशिवाय जाग्यावरुन खेळण्याचा केलेला प्रयत्न तो दुखापतीतून अजून सावरलेला नाही, वाटावे असाच होता. ही ऑस्ट्रिलियन संघासाठी चिंतेची बाब निश्चितच असेल. अपेक्षेप्रमाणे नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात डेविड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यांनी केली. संघाच्या धावफलकावर अवघ्या 6 धावा असताना वॉर्नर बाद झाला. पुजाराने कोणतीही चूक न करता स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला.

पावसामुळे पहिल्या सत्रातील खेळ 7.1 षटकानंतरच थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. पावसानंतर आउटफिल्डचा फायदा गोलंदाज उठवणार की फलंदाज हे पाहणे आता महत्तवाचे ठरणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकत मालिकेत बरोबरी मिळवली आहे. वॉर्नर बाद झाल्यानंतर लाबुशेने आणि विल पुलोवस्की यांच्यावर संघाचा डाव सावरण्याचे आव्हान आहे. 

दुखापतीमुळे वॉर्नरप्रमाणेच पुलोवस्की देखील पहिल्या दोन सामन्यात मैदानात उतरु शकला नव्हता. सिडनीच्या कसोटी सामन्यातून तो पदार्पण करत आहे. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात दमदार खेळ करुन संघासाठी बहुमुल्य योगदान देण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दिमाखदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा आघाडी घेण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.

स्मिथही मागील दोन्ही सामन्यात चमकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरही ऑस्ट्रेलियाचा डाव फुलवण्याची मोठी जबाबदारी असेल. दुसरीकडे भारत लाबुशेन आणि स्मिथसाऱख्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल.
 


​ ​

संबंधित बातम्या