AusvsInd : पिंक बॉल विसरा; अजिंक्यच्या शिलेदारांनी कांगारुंना दिला 'रेड अलर्ट'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 29 December 2020

टीम इंडियाने जिंकूनं दाखवलं

ऑस्ट्रेलियन संघाने ठेवलेल्या 70 धावांचे आव्हान भारतीय संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात पार करत मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. अल्प धावांचा पाठलाग करण्यासाठी मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल जोडीनं भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. 15 चेंडूत अवघ्या 5 धावा करुन माघारी फिरला. चेतेश्वर पुजाराही अवघ्या 3 धावांवर बाद झाला. शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी नाबाद परत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात शतकी खेळी करुन भारताला मजबूत आघाडी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अजिंक्यने लायनच्या चेंडूवर विजयी धाव घेतली. दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने 8 गडी राखून जिंकला आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 5 सामने जिंकले होते. 

पिंक बॉलवर टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला तर मालिकेत 4-0 अशी नामुष्की स्वीकारावी लागेल, असा तर्क मालिका सुरु होण्यापासून लावण्यात येत होता. मात्र अजिंक्यच्या शिलेदारांनी हे दावे खोडून काढत मालिकेत बरोबरी साधली आहे. पिंक बॉलवर भारताला मोठा पराभव स्विकारावा लागला असला तरी उर्वरित मालिकेतील दोन्ही सामने रेड बॉलवर खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेड बॉलवरील हा विजय यजमान पाहुण्यांसाठी धोक्याची घंटाच असेल.

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत यजमान ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलण्यात यश मिळवले आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियान 6 बाद 133 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. या धावसंख्येत अवघ्या 67 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा संघ  200 धावांत आटोपला. त्यामुळे भारतीय संघाला 70 धावांचे टार्गेट मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 धावा केल्या होत्या. त्यानंतर बॅटींग करताना टीम इंडियाने 326 धावा केल्या होत्या. कर्णधार अजिंक्य रहाणे (112), रविंद्र जडेजा (57) आणि शुभमन गिल (45) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रित बुमराह, आर, अश्विन, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. तर उमेश यादवला एक यश मिळाले.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. सिराजने त्याची विकेट घेतली. सलामीवीर मॅथ्यू वेडने 40 धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. लाबुशेन 28, कमिन्स 22, ट्रॅविस हेड 17, हेजलवूड 10 तर स्टार्क 14 धावांवर नाबाद राहिला. याशिवाय अन्य खेळाडू एकांकी धावसंख्या करुन तंबूत परतले.
 


​ ​

संबंधित बातम्या