ब्रिस्बेन टू संगमनेर विजयाचा गोडवा; अजिंक्यच्या आजीसोबत गावकऱ्यांचा आनंदोत्सव

आनंद गायकवाड
Tuesday, 19 January 2021

अजिंक्यचे त्याच्या आजीवर खुप प्रेम आहे. त्यांच्या गावाकडच्या बंगल्याचे नावही त्याने झेलू ठेवले आहे. इतकेच नाही तर विवाहापूर्वी त्याची वाग्दत्त वधूही त्याने आजीला दाखवण्यासाठी म्हणून चंदनापूरीला आणली होती अशी आठवण त्याचे मामा डॉ. गणेश गायकवाड ( आश्वी खुर्द, ता. संगमनेर ) यांनी सकाळशी बोलताना सांगितली.

संगमनेर : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील विजयाच्या गुलालाचा धुराळा खाली बसण्यापूर्वीच पुन्हा एकदा जल्लोष करण्याची संधी तालुक्यातील चंदनापूरी ग्रामस्थांना मिळाली. भुमिपूत्र क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्याचा आनंदोत्सव अजिंक्य रहाणेचे चुलते आणि वयोवृध्द आजींसमवेत भावकीने साजरा केला.

मूळचा संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथील अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेट संघाचे कसोटीत नेतृत्व करीत आहे. ही बाब गावकऱ्यांसाठी खास आनंदाची ठरली. त्यातच ग्रामपातळीवरच्या निवडणूकांमुळे कालपर्यंत गावात उत्साहाची लाट उसळली आहे. त्यात आज ब्रिस्बेनच्या मैदानातील निर्णायक आणि चौथा  कसोटी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी घरातील टीव्हीसमोर बसलेले युवक आणि अबालवृध्द अजिंक्यचा खेळ पहात होते. या लढाईची उत्सुकताही शिगेला पोचली होती. अपेक्षेप्रमाणे भारताने चौथ्या कसोटीत 3 विकेट राखून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवीत धडाकेबाज विजयाची नोंद केली. इतकेच नाही तर कांगारुंच्या नाकावर टिच्चून चार सामन्यांची मालिकाही 2-1 अशी खिशात घातली.

अजिंक्य म्हणतोय, अश्रूंची किंमत गोड! शास्त्रींनी मराठीत पुजाराला दिली 'बॅटल मॅन'ची उपमा (VIDEO)

 या विजयाने गावात एकच जल्लोष झाला. पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेसाठी फटाके फुटले. हा विजय त्याच्या कुटूंबात सध्या गावाकडे शेतीवर राहणारे चुलते सिताराम बाबुराव रहाणे, चुलती लक्ष्मीबाई आणी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे अजिंक्यची झेलुबाई ही नव्वदीपार केलेली आजीला गावकऱ्यांनी ही आनंदवार्ता सांगत कुटूंबियांना पेढे भरवून, त्यांच्या अजिंक्यचा विजय तोंड गोड करुन साजरा केला.
 


​ ​

संबंधित बातम्या