AUS vs IND: ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आगाऊपणा; भारतीय खेळाडूंना पुन्हा शिवीगाळ

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

चौथ्या दिवशीही प्रेक्षकांमधून भारतीय खेळाडूंना टार्गेट करण्यात आले. काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केल्यामुळे सामना काहीकाळ थांबवावा लागला.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या स्लेजिंगच्या माऱ्याचा सामना करावा लागला. बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना वर्णद्वेषावरुन टिप्पणी केल्याचा वाद आयसीसीपर्यंत पोहचला असताना चौथ्या दिवसातील खेळातही प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वीच भारतीय संघाने यासंदर्भात मॅच रेफ्री आणि अंपायर्सकडे तक्रार केली होती.  

चौथ्या दिवशीही प्रेक्षकांमधून भारतीय खेळाडूंना टार्गेट करण्यात आले. काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना शिवीगाळ केल्यामुळे सामना काहीकाळ थांबवावा लागला. पोलिसांनी आगाऊपणा करणाऱ्या प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढल्याचेही वृत्त देखील समजते. मोहम्मद सिराजला उद्देशून प्रेक्षक गॅलरीतून असभ्य भाषा वापरण्यात आल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सिराजसह अन्य खेळाडूंनी अंपायरकडे तक्रार केली. स्टेडियममधून  ज्या  प्रेक्षकांतून शिवीगाळ झाली त्यांना बाहेर काढल्यानंतर चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. लाबुशेन, स्मिथ आणि कॅमरुन ग्रीनच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 6 बाद 312 धावांवर डाव घोषीत केला. मालिका 1-1 बरोबरीत असताना तिसरा कसोटी सामन्याच्या निकालासाठी पाचव्या दिवसांपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशी लागत असल्याचे पाहायला मिळाले होते. हा सामना मात्र पाचव्या दिवसांपर्यंत जाणार आहे. यात कोण बाजी मारणार की बरोबरी कायम राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 


​ ​

संबंधित बातम्या