AusvsInd : नडण्यापेक्षा लढले अन् ड्रॉ करुनही जिंकले!

सुशांत जाधव
Monday, 11 January 2021

अर्धा संघ तंबूत धाडलेल्या कांगारुंचा जीव जसा खालीवर होऊ लागला तसा मैदानात संयमी खेळी करत असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डिवचायला सुरु केले. लायनच्या एका षटकात ऑसी कर्णधार टीम पेनने अश्विनला खवळण्याचा प्रयत्न केला. त्याने टीम इंडियाविरोधात स्लेजिंगचा रडीचा डाव खेळला.

India Draw Sydney Test Against Australia :  भारतीय संघाचा सेनापती अजिंक्य रहाणे लवकर बाद झाल्यानंतर भारतीय संघाची एक नवी रणनिती अनुभवायला मिळाली. अष्टपैलू हनुमा विहारी ऐवजी पंतला बढती देण्याच्या प्रयोग झाला. आणि पंतने विश्वास सार्थ करत अजिंक्यसारखी मोठी विकेट पडूनही पहिलं सत्र भारतीय संघाच्या नावे करुन दाखवलं. जड पावलानं धावणारा आणि संथ खेळीमुळं टीकेचा सामना कराव्या लागलेल्या पुजाराने आपली 'भक्ती' आणि 'शक्ती' संयमच असल्याचे दाखवून देत खेळण्यावर फोकस केला. त्याच्यानंतर मैदानात उतरलेला पंतवरही पुजाराने जादू केली की काय? असा प्रश्न पंतची सुरुवातीची बॅटिंग पाहून अनेकांना पडला असेल. 30 हून अधिक चेंडू खेळून त्याच्या नावे 5-6 धावा दिसत होत्या. पण या पठ्यानं गियर बदलला आणि 64 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हाच होता टीम इंडियाचा गेम प्लॅन. 

संयमी पुजारासोबत क्रमाप्रमाणे जर हनुमा आला असता तर संघावरील दबाव आणखी वाढला असता. पंतची विकेट पडली असती तरी तेच झालं असते. पण पंतने 97 दमदार खेळी केली आणि भारताने कमबॅक केले. पंतचं कसोटी कारकिर्दीतील शतक हुकलं यापेक्षा तो बाद झाल्यामुळे विजयाची संधी हुकली हे अधिक टोचत राहणार आहे. पुजारा हळू खेळला असला तरी त्याच्या खेळीमुळं पराभवाची घंटी वाजली नाही, हे देखील मान्य करावंच लागेल. या दोघांनी मैदान सोडल्यानंतर भारतीय संघ पुन्हा संकटात सापडला. हनुमा विहारी-अश्विन मैदानात खेळत असताना दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाने बांधावे लागलेले पॅड भारतीय संघ संकटात सापडल्याची चाहूल देणारा होता. ही जोडी फोडून कांगारुंना सामना आपल्या बाजून पूर्णता वळवायची संधी होती. पण या दोघांनी कांगारु गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. 

Aus vs Ind 3rd Test Draw : हनुमा-अश्विननं कांगारुंना रडवलं!

अर्धा संघ तंबूत धाडलेल्या कांगारुंचा जीव जसा खालीवर होऊ लागला तसा मैदानात संयमी खेळी करत असलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डिवचायला सुरु केले. लायनच्या एका षटकात ऑसी कर्णधार टीम पेनने अश्विनला खवळण्याचा प्रयत्न केला. त्याने टीम इंडियाविरोधात स्लेजिंगचा रडीचा डाव खेळला. पण त्याला नडत  बसण्याऐवजी अश्विनं शांत डोक्याने या प्रकाराचा सामना केला. लायन चेंडू फेकताना तो तब्बल तीन वेळा तो यष्टिसोडून बाहेर पडला. विकेटमागून टीम पेन करत असलेल्या स्लेजिंगला ते चोख उत्तर होते. तोंड बंद करणार नसशील तर मी ही खेळत नाही, असा इशारा अश्विनने टीम पेनला दिला. अन् सामना पुढे सुरु झाला. अश्विनचा हा भाव पेनला इतका दबाव टाकणारा होता की त्याने अश्विनला बाद करण्याची एक संधीही हुकली. 

या सामन्यादरम्यान भारतीय संघातील खेळाडूंना प्रेक्षकांकडून झालेल्या वर्णभेदी टिप्पणी सामना करावा लागला होता. या प्रसंगानंतर भारतीय संघाने शांततेच्या मार्गाने योग्य तो न्याय मागितला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिडनीत पराभवाची नामुष्की टाळणे गरजेचे होते. मानसिकरित्या झालेल्या आघातावर अनिर्णित सामन्याने मलम लावली गेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

-सुशांत जाधव

Email : sushant.jadhav@esakal.com
 


​ ​

संबंधित बातम्या