AUSvsIND : कॅमेरून ग्रीनच्या शतकीय खेळीने ऑस्ट्रेलियाची भारतावर बढत  

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला तीन दिवसीय सराव सामना खेळवण्यात येत आहे.

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात पहिला तीन दिवसीय सराव सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने शतक झळकावले होते. तर आज ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू कॅमेरून ग्रीनने शतकाची नोंद केली. ग्रीनने आज नाबाद 114 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 39 धावांची बढत मिळवून दिली आहे. भारतीय संघाने नऊ गडी गमावत 247 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. 

AUSvsIND : टी-ट्वेन्टी मालिका विजयानंतर टीम इंडियाला धक्का बसण्याची शक्यता 

भारताच्या पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आठ गडी गमावून  286 धावा केल्या आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात भारताने आठ गडी राखून 237 धावांनी केली होती. यानंतर मोहम्मद सिराज शून्य धावांवर बाद झाल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे याने संघाचा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावात अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 242 चेंडूंत 18 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 117 धावा केल्या होत्या. तर चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले होते. 

आज ऑस्ट्रेलिया संघाची सुरवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलिया अ संघाला विल पुकोवस्की (1) च्या रूपात पहिला धक्का बसला. त्यापाठोपाठ जो बर्न्स (4) ला देखील भारतीय संघाने लवकर माघारी धाडले. त्यानंतर मार्क हॅरिस (35) आणि कर्णधार ट्रॅव्हिस हेड (18) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील मोठी खेळी करता आली नाही. 

AUSvsIND 2 T20 : सामन्यातील काही खास क्षण एका नजरेत (फोटो)

यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या कॅमेरून ग्रीनने क्रीझवर पाय रोवत भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. मात्र दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना बाद केले. हॅरिस आणि हेड हे दोघेही बाद झाल्यानंतर निकला (23) आर अश्विनने व टीम पेनला (44) उमेश यादवने माघारी पाठवले. भारताकडून सर्वाधिक विकेट्स उमेश यादवने घेतल्या. त्याने तीन विकेट्स मिळवले. तर मोहम्मद सिराजने आणि आर अश्विनने प्रत्येकी दोन-दोन बळी मिळवले.   


​ ​

संबंधित बातम्या