AUS vs IND स्टार्कचा गुलाबी चेंडूवरील प्रभाव आणि जोश हेझलवूडचे आव्हान

संजय घारपुरे
Monday, 14 December 2020

भारताविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी 20 लढतीनंतर स्टार्कने रजा घेतली होती. पण आता तो कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. स्टार्क हा व्यावसायिक खेळाडू आहे. त्याची पूर्वतयारी ब्रेकमध्येही नक्कीच सुरू असेल.

ऍडलेड: कन्कशन प्रश्‍नांनी बेजार असलेल्या ऑस्ट्रेलिया संघास मिशेल स्टार्कच्या पुनरागमनाने ताकद मिळाली आहे. गुलाबी चेंडूच्या कसोटीत स्टार्क किती प्रभावी ठरतो, हे सर्वच जाणतात, असे सांगत जोश हेझलवूडने भारताविरुद्ध शाब्दिक तोफा डागल्या. 

डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने गुलाबी चेंडूचा वापर होणाऱ्या प्रकाशझोतातील सात कसोटीत 42 फलंदाज 19.23 च्या सरासरीने बाद केले आहेत. कुटुंबातील आजारपणामुळे स्टार्कने रजा घेतली होती. तो सोमवारी संघात दाखल होणार आहे. स्टार्क आमच्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. आक्रमणातील प्रमुख घटक आहे. तो गुलाबी चेंडूंनी किती प्रभावी ठरतो हे सर्वच जाणतात, असे हेझलवूडने सांगितले. 

भारताविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी 20 लढतीनंतर स्टार्कने रजा घेतली होती. पण आता तो कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. स्टार्क हा व्यावसायिक खेळाडू आहे. त्याची पूर्वतयारी ब्रेकमध्येही नक्कीच सुरू असेल. थेट आक्रमणावरही तो दाखल होऊ शकेल, या वर्षाने कधीही काहीही घडू शकते, तसेच प्रत्येक प्रश्‍नास सामोरे जाण्यासाठी कधीही तयार असावे लागते हे शिकवले आहे. स्टार्कही यास अपवाद नसेल, असे हेझलवूड म्हणाला. 

स्टार्कने पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताचे तीन फलंदाज बाद केले होते. उसळत्या चेंडूवर त्याने हे यश मिळवले होते. वेगवान आणि उसळते चेंडू ही ऑस्ट्रेलियाची कायम खासियत आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्याही यास साथ देतात. खेळपट्ट्या आता फलंदाजीस अनुकूल होत आहेत, त्यामुळे कदाचित आम्हाला वेगळ्या क्‍लृप्त्या लढवणे भाग पडेल. उसळत्या चेंडूंना लेग साईडच्या क्षेत्ररक्षकांची साथ देऊन यश मिळवता येईल. 

हेझलवूड म्हणतो... 
- खेळाडूंच्या एवढ्या लागोपाठच्या दुखापती काहीसे धक्कादायक 
- आयपीएल खेळल्यानंतरही ट्‌वेंटी 20 मध्ये अपेक्षित कामगिरी नाही 
- ऍडलेडमधील सराव सत्रात संघ कसोटीसाठी नक्कीच तयार होईल 
- कोहलीविरुद्ध मर्यादित षटकांच्या लढतीत यश, पण कसोटीत नव्यानेच सुरुवात 
- यापूर्वीच्या कसोटी मालिकेत विराटकडून धावा, पण यावेळची कसोटी गुलाबी चेंडूंवर 

गतमालिकेत पुजाराने केवळ धावाच केल्या नाहीत, तर त्याने आमच्या प्रमुख गोलंदाजांना जास्तीतजास्त वेळ गोलंदाजी करण्यास भाग पाडले. फलंदाज गोलंदाजांना थकवण्याकडेही लक्ष देतात. दोन कसोटीत फारसे अंतर नसेल, तर फलंदाज हे साधण्यासाठी नक्कीच कसोशीने प्रयत्न करतात. यावेळी हे नक्कीच टाळण्याचे लक्ष्य असेल. 
- जोश हेझलवूड
 


​ ​

संबंधित बातम्या