रोहितसह पाच जणांनी दिली होती बीफची ऑर्डर? व्हायरल बिलामुळं फुटले नव्या वादाला तोंड

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रोहित शर्मासह पाच जणांनी एका रेस्टोरेंटमध्ये जेवणासाठी गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बीसीसीआयने मात्र खेळाडूंवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर सिडनी कसोटीपूर्वी संघातील काही खेळाडू वादात सापडले आहेत. पहिल्या कसोटी सामन्याला मुकलेला आणि ज्याच्या पुनरागमनामुळे भारताची ताकद वाढेल अशी चर्चा रंगली होती तो रोहित शर्मा आणि ऋषभ पंत, शुभमन गील, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ या मंडळींनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा रंगली आहे. बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड संबंधित घटनेची चौकशी करत आहे. 

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी रोहित शर्मासह पाच जणांनी एका रेस्टोरेंटमध्ये जेवणासाठी गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघातील पाच जणांनी रेस्टोरेंटमध्ये जाऊन जेवण केले होते. एका भारतीय चाहत्याने त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. यादरम्यान नवदीप सिंह नावाच्या चाहत्यानेच भारतीय संघाचे बील भरल्याचीही चर्चा रंगली. 

...म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या वरिष्ठ संघात मिळाले स्थान

आता या बीलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 118.69 डॉलर इतक्या बीलामध्ये बीफची ऑर्डर होती, असे दिसते. यावरुन आता नेटकरी भारतीय संघातील या खेळाडूंना ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर जे बील व्हायरल होत आहे त्यात बीफ आणि पोर्क ऑर्डर मागवल्याचे दिसून येते. पण हे बील खरे आहे की खोटे याची पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर काही नेटकरी खेळाडूंना टार्गेट करत असले तरी काहीजण खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे देखील येत आहेत.   

भारतीय संघातील खेळाडूंसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या नवदीप सिंहनेही सोशल मीडियावर माफी देखील मागितली आहे. रोहित शर्मा,शुभमन गिल, ऋषभ पंत, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ यांच्यावर जैव सुरक्षिततेच्या नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांचे वृत्त फेटाळून लावले होते.  7 जानेवारीपासून भारतीय संघ सिडनीच्या मैदानात तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या