रवींद्र जडेजाची उणीव कोण भरणार? फलंदाजाकडून अपेक्षा

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित ट्‌वेन्टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही आणि त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने प्रभावी मारा केला होता.
 

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या होणाऱ्या दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यातही बाजी मारून मालिका जिंकण्याची संधी मिळणार आहे, परंतु जडेजाची फलंदाज म्हणून उणीव कोण भरून काढणार, हा मोठा प्रश्‍न भारतीय संघासमोर आहे. दुखापतीमुळे जडेजा या मालिकेतून बाहेर गेला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि एक ट्‌वेन्टी-२० असे चार सामने झाले आहेत. यातील अखेरचे दोन सामने भारताने जिंकले, पण यामध्ये जडेजाची फलंदाजी निर्णायक ठरली होती. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आक्रमक नाबाद ६६; तर पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात नाबाद 44 धावा केल्या होत्या.

Record : 3 सामन्यांची T20 मालिका विराटने कधीच गमावलेली नाही​

प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावर जडेजाच्या या स्फोटक खेळी निर्णायक ठरल्या होत्या, त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात जडेजाची भरपाई करणारी खेळी कोणाला तरी करावी लागणार आहे. जडेजाच्या ‘कन्कशन सब्टीट्यूट’ नियमाचा भारताने फायदा घेतला, त्यामुळे पराभवाची झळ लागलेला ऑस्ट्रेलिया संघ डिवचला गेला आहे. उद्या अधिक आक्रमकपणे ते भारतीय संघावर आक्रमण करण्याची शक्‍यता आहे.

सिडनी अपयशी मैदान
या दौऱ्यात सिडनी हे मैदान भारतीय संघासाठी प्रामुख्याने गोलंदाजांसाठी अपयशी ठरलेले आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने याच मैदानावर झाले होते. पहिल्या सामन्यात ३७४; तर दुसऱ्या सामन्यात ३८९ धावा भारतीय गोलंदाजांनी दिल्या होत्या. उद्याचा ट्‌वेन्टी-२० सामनाही सिडनीत होणार असल्यामुळे गोलंदाजांना सावध राहावे लाहणार आहे.

मोहम्मद शमीऐवजी शार्दुल?

रवींद्र जडेजा दुखापतीमुळे उर्वरित ट्‌वेन्टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही आणि त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने प्रभावी मारा केला होता.
 

रोहित शर्मा नसला तरी भारतीय संघात आयपीएल गाजवलेले फलंदाज आहेत, पण केएल राहुलचा अपवाद वगळता कोणालाही प्रभाव पाडता आलेला नाही. आता फॉर्म आणि क्षमता सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे. शनिवारी वाढदिवस साजरा करणारा शिखर धवन, कर्णधार विराट कोहली यांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या दौऱ्यासाठी आयपीएलचा स्टार सूर्यकुमारऐवजी संधी देण्यात आलेला मनीष पांडे यालाही आपली निवड सिद्ध करावी लागणार आहे.

युझवेंद्र चहलवर लक्ष

लेग स्पिनर युझवेंद्र चहल सिडनीच्या याच मैदानावर फारच महागडा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे कॅनबरातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते. कॅनबरातच शुक्रवारी झालेल्या पहिल्या ट्‌वेन्टी-२० लढतीत अनपेक्षितपणे खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने कमाल करत तो सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता. त्यामुळे  तो कशी कामगिरी करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.   

 


​ ​

संबंधित बातम्या