ब्रिस्बेनच्या हॉटेलात टीम इंडियावर असुविधेचं संकट

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

टीम इंडियाला सुविधा मिळणार की नव्या वादाला तोंड फुटणार हे येणाऱ्या काही दिवसांत समोर येईल.

AusvsInd 4th Test In Brisbane : आस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये पोहचला आहे. या ठिकाणी आता भारतीय संघासमोर नवे संकट उभारले आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणात बीसीसीआयने हस्तक्षेप केल्यानंतर खेळाडूंना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन संघाला देण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे. त्यानंतर भारतीय संघाला असुविधा होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. 

Thailand Badminton Open : सायनाच्या कोरोना रिपोर्टमध्ये गोंधळ; कोर्टवर उतरण्याचा मार्ग मोकळा!

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये रुम सर्व्हिस किंवा हाऊस किपिंग नाही. आतंरराष्ट्रीय दर्जाची जिम देखील उपलब्ध नाही. खेळाडूंना स्विमिंग पूलच्या सुविधेशिवाय रहावे लागणार आहे. भारतीय संघाने ज्यावेळी चेक इन केले त्यावेळी या सर्व सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले होते. भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना  15 जानेवारीपासून रंगणार आहे. याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आणि न्यू साउथ वेल्ससह सीमा भागात लॉकडाउन असल्यामुळे संघाला क्वारंटाईनच्या नियमावलीचे कठोरपणे पालन करावे लागणार आहे.

 हॉटेलमध्ये खेळाडूंना एकत्रित येण्यासाठी एक रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुममध्ये खेळाडू एकमेकांना भेटू शकतात. दोन्ही टीमला समान सुविधा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणातून नव्या वादाला तोंडही फुटू शकते.    


​ ​

संबंधित बातम्या