AUS vs IND: ' फक्त द्रविडच टीम इंडियाला संकटातून बाहेर काढू शकतो'

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

ऑस्ट्रेलियन परिस्थितीत हवेत हलणाऱ्या चेंडूचा सामना कसा करावा, यासंदर्भातील मार्गदर्शन राहुल द्रविडशिवाय अन्य कोणीही देऊ शकत नाही. टीम इंडियाला नेट प्रॅक्टिसवेळी राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभले तर ते संघाच्या हिताचे ठरेल, असे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.

India Tour Of Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था केविलवाणी झाली. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात अख्खा संघ अवघ्या 36 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर एकाही फंलदाजाला तग धरता आले नाही. ऍडलेडच्या मैदानात भारतीय फलंदाजांची उडलेली तारांबळ पाहून भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयला खास सल्ला दिलाय. टीम इंडियाची सध्याची अवस्था पाहता राहुल द्रविडला तात्काळ ऑस्ट्रेलियात पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन परिस्थितीत हवेत हलणाऱ्या चेंडूचा सामना कसा करावा, यासंदर्भातील मार्गदर्शन राहुल द्रविडशिवाय अन्य कोणीही देऊ शकत नाही. टीम इंडियाला नेट प्रॅक्टिसवेळी राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभले तर ते संघाच्या हिताचे ठरेल, असे वेंगसरकर यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमी बंदच आहे. त्यामुळे द्रविडचा योग्य वापर करुन घेण्यासाठी बीसीसीआयकडे संधी आहे, असा उल्लेखही वेंगसरकरांनी एका इंग्रजी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलाय. 
आफ्रिदी म्हणाला, टीम इंडियात कमबॅक करण्याची ताकद आहे, पण...

माजी कर्णधार पुढे म्हणाला की, जरी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात जाऊन क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार असेल तरी सिडनी कसोटीसाठी त्याचे मार्गदर्शन संघाच्या फायद्याचे ठरेल. 7 जानेवारीपासून टीम इंडिया सिडनीच्या मैदानात कसोटी सामना खेळणार आहे. 2003 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केले होते. यावेळी राहुल द्रविडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अविस्मरणीय सामन्यात द्रविडने 233 आणि 72* धावांची खेळी केली होती. या दौऱ्यात द्रविडने 123.8 च्या सरासरीनं 619 धावा केल्या होत्या. 

कोहलीला हटवा; टीम इंडियाच्या फ्लॉपशोनंतर हिटमॅनचा ट्रेंड

पिंक बॉलवर झालेल्या ऍडलेड कसोटीत भारतावर मोठी नामुष्की ओढावली होती. पहिल्या डावात 60 धावांपेक्षा अधिक लीड घेऊनही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताने अवघ्या 27 धावांत 8 विकेट गमावल्या. मोहम्मद शमी दुखापतीमुळे रिटायर हर्ट झाला. परिणामी भारताचा दुसरा डाव 9 बाद 36 धावांवरच थांबला. यापूर्वी 1974 मध्ये भारताने कसोटी सामन्यात निचांकी धावसंख्या केली होती. इंग्लंडने टीम इंडियाला 42 धावांत रोखले होते. यापेक्षाही खराब कामगिरीची नोंद विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या नावे झाली. भारताच्या एकाही गड्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही. 1924 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी पहिल्यांदाच पाहायला मिळाली. ज्यामध्ये कसोटीच्या एका डावात संघातील एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अगरवालने केलली 9 ही धावसंख्या भारताच्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.


​ ​

संबंधित बातम्या